‘मला राहुल द्रविडसाठी हा वर्ल्डकप जिंकायचा आहे’, रोहित शर्मा झाला भावूक; सांगितलं यामागील कारण

भारतीय संघ वर्ल्डकप जिंकण्यापासून फक्त एक सामना दूर आहे. भारतासमोर आता फक्त ऑस्ट्रेलियाचा अडथळा असून तो दूर करत वर्ल्डकपवर आपलं नाव कोरण्याचा संघाचा मानस आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये दोन्ही संघ भिडतील. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने प्रशिक्षक राहुल द्रविडसाठी हा वर्ल्डकप आपल्याला जिंकायचा आहे असं भावूक विधान केलं आहे. वर्ल्डकपच्या पूर्वसंध्येला रोहित शर्माने पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्याने अनेक प्रश्नांची मनमोकळी उत्तरं दिली. 

खेळाडूंना आपली भूमिका कळावी यामध्ये राहुल द्रविडने फार मोठी भूमिका निभावल्याचं रोहित शर्माने सांगितलं. “मी एक विचार करत असतो आणि जर प्रशिक्षक त्यावर सहमत नसेल तर तसाही विचार करावा लागतो. राहुल भाई कसं क्रिकेट खेळला आणि मी कसं क्रिकेट खेळतोय हे तुम्ही पाहू शकता. नक्कीच ते पूर्ण वेगळं आहे. आम्हाला हवं तसं खेळण्याचं स्वातंत्र्य देणं यातूनच त्याच्याबद्दल समजतं,” असं रोहित शर्मा म्हणाला.

‘2 वर्षांपासून सुरु होता योग्य खेळाडूंचा शोध,’ रोहित शर्माचा खुलासा; शमी आणि राहुल द्रविडबद्दल केलं मोठं विधान

Related News

 

“राहुल द्रविडची भूमिका फार मोठी आहे. द्रविडचं खेळाडूंना पूर्ण समर्थन असतं आणि त्यांना स्वातंत्र्य देतो. तो खेळाडूंसाठी उभाही राहतो. 2022 च्या टी-20 वर्ल्डकपनंतर त्याने खेळाडूंचं समर्थन केलं. त्याने भारतीय क्रिकेटसाठी जे केलं ते फार मोठं आहे. या क्षणाचा भाग होण्याची त्याचीही इच्छा आहे. आणि आम्हाला त्याच्यासाठी हा वर्ल्डकप जिंकायचा आहे,” असं रोहित शर्मा म्हणाला. 

मोहम्मद शमीला सुरुवातीला का खेळवलं नाही?

रोहितने यावेळी जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या मोहम्मद शमीबद्दल म्हटलं की, “पहिल्या हाफमध्ये मोहम्मद शमी खेळू शकला नाही. त्याच्यासाठी तो फार अवघड क्षण होता. पण सिराज आणि इतर गोलंदाज चांगली कामगिरी करत होते. आम्ही त्याला तुला का संधी दिली जात नाही आहे याबद्दल सांगितलं होतं. तो आपल्या गोलंदाजीवर फार मेहनत घेत होता. यावरुन तो स्पर्धेआधी कोणत्या मानसिक स्थितीत होता हे दिसत आहे”.

अश्विनला संधी मिळणार का? 

“हा एक मोठा क्षण आहे यात कोणताही वाद नाही. आतापर्यंत जे काही झालं आहे ते स्वप्नवत आहे. आव्हानांचा सामना करत लक्ष्य केंद्रीत करणं हे एका खेळाडूला सर्वाधिक आव्हानात्मक असतं. हा आमच्या करिअरमधील मोठा क्षण आहे. त्यामुळे आपली योजना नीट अंमलात यावी यासाठी संयम राखणं महत्त्वाचं आहे. तुम्ही रोज वर्ल्डकप फायनल खेळत नाही. मी वर्ल्डकप पाहत मोठा झालो आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा मोठा क्षण आहे,” अशी कबुली रोहित शर्माने दिली आहे.

प्लेइंग 11 कशी असेल?

तसंच प्लेइंग 11 बद्दल बोलताना त्याने सांगितलं की, “अद्याप आम्ही त्यासंदर्भात निर्णय घेतलेला नाही.15 पैकी कोणतेही खेळाडू खेळू शकतात. आम्ही विकेटचं निरीक्षण केल्यानंतर निर्णय घेऊ. विरोधी संघाच्या भक्कम आणि कमकुवत बाजूंचं आकलन करत निर्णय घेतला जाईल,” असं रोहितने यावेळी स्पष्ट केलं.Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *