विरारमध्ये घर घेण्याचा विचार करत असाल तर आधी ही बातमी वाचा! 55 इमारतींचा घोटाळा उघड

Virar Crime News : विरार हे सध्या झपाट्याने विकसीत होत आहे. बजेटमध्ये घर मिळत असल्याने अनेक जण विरारमध्ये घर खरेदी करत आहेत. मात्र, विरारमध्ये घर खरेदी करण्यापूर्वी व्यवस्थीत चौकशी करा नाहीत मोठ्या फसवणुकीला बळी पडाल.  वसई विरार मध्ये इमारतीचे बनावट ओसी, सीसी व बनावट स्टॅम्प बनवणारी टोळीचा पर्दाफाश झाला आहे.  विरार पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत पाच जणांना अटक केली आहे. विरारमध्ये 55 इमारतींचा घोटाळा उघड झाला आहे. 

55 अनधिकृत इमारतींना बोगस CC बनवून दिले

विरार मध्ये इमारतीला लागणाऱ्या सीसी साठी बनावट रबरी स्टॅम्पचा वापर करून 55 अनधिकृत इमारतींना बोगस सीसी बनवून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विरार पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. या अटक आरोपींच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या आरो पींनी ठाणे, पालघर जिल्हाधिकारी, जव्हार अतिरिक्त जिल्हाधिकारी, वसई तहसीलदार, दुय्यम निंबंधक आणि वसई विरार पालिकेतील नगर रचना विभाग अशा विविध खात्याचे रबरी स्टॅम्प बनविले होते.  पोलिसांनी आरोपींच्या घरात आणि कार्यालयात झाडाझडती घेतली असता त्यात सिडको तसेच पालिकेचे 1100 लेटरपॅडही हस्तगत केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

असे सापडले आरोपी

या स्टॅम्पच्या आधारे आरोपी हे वसई विरार, ठाणे परिसरातील इमारतींना बोगस सीसी, ओसी प्रमाणपत्र देयायचे काम करीत होते.
विरारच्या कोपरी परिसरातील एका इमारतीच्या परवानगी साठी लागणाऱ्या कागदपत्राचा वापर करून वसईत रुद्राक्ष नावाची पाच मजल्याची अनधिकृत इमारत बांधण्यात आली होती, याबाबत पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी विरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा अधिक तपास करत असताना पोलीस बनावट सीसी, ओ सी, व बनावट रबरी स्टॅम्प बनवणाऱ्या आरोपींपर्यंत पोहोचले व त्यांना अटक केली. अटक आरोपिंमध्ये रुद्रान्स रियलटर्स चे विकासक दिलीप बेनवंशी, मयूर इंटरप्राईजेस चे मालक मच्छिंद्र मारुती वनमाने, फिनिक्स कॉर्पोरेशनचे मालक दिलीप अनंत अडखळे, रुद्रांश रिअल्टर्स चे भागीदार प्रशांत मधुकर पाटील व राजेश रामचंद्र नाईक यांचा समावेश आहे.
वसई विरार परिसरात निम्म्याहून अधिक इमारती या अनधिकृत रित्या बांधण्यात आलेल्या आहेत. या इमारतींना बनावट सीसी, ओसी वापरण्यात आले आहेत. त्यातच विरार पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर वसई विरार परिसरात घरे खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या मनातली धाकधूक अजून वाढली आहे.

Related News



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *