राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या मुंबई अध्यक्ष निवडीबाबत सुनील तटकरेंची महत्त्वाची माहिती

मुंबई (Mumbai) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अजित पवार गटाच्या (Ajit Pawar Group) मुंबई अध्यक्षपदी समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांची निवड जवळपास निश्चित झाली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एबीपी माझाशी बोलताना याबाबत स्पष्ट सांगितलं आहे. “समीर भुजबळ यांना आम्ही जबाबदारी देणार आहोत,” असं सुनील तटकरे म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या उपस्थितीत आज दुपारी चार वाजता गरवारे क्लब इथे बैठक पार पडणार आहे. या बैठकीत समीर भुजबळ यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

मुंबई अध्यक्षपदाबाबत विचारलं असता सुनील तटकरे म्हणाले की, “आज आम्ही बैठक घेतोय आणि नवीन मुंबई अध्यक्ष जाहीर करणार आहोत. नवाब मलिक वैद्यकीय कारणास्तव बाहेर आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्या जागी नवीन अध्यक्ष नेमत आहोत. समीर भुजबळ यांना आम्ही जबाबदारी देणार आहोत.” सुनील तटकरे यांच्या या वक्तव्यानंतर एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालं आहे.

Related News

दरम्यान, नवाब मलिक जेलमधून जरी बाहेर आले असले तरी वैद्यकीय कारणास्तव सध्या ते पक्षीय कामकाजात सहभागी होताना दिसत नाहीत. त्यामुळे मुंबई अध्यक्षपदी दुसऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होती. या पदासाठी मुंबईतून शिवाजीराव नलावडे आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नावाची चर्चा होती. परंतु शिवाजीराव नलावडे यांच्या नावाला प्रचंड विरोध होता. त्यामुळे समीर भुजबळ यांच्या गळ्यात मुंबई अध्यक्षपदाची माळ पडणार असल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली होती. त्यानंतर आता सुनील तटकरे यांनी आम्ही समीर भुजबळांना जबाबदारी देणार असल्याचं सांगितलं. 

समीर भुजबळ यांच्या निवडीची कारणे

1) समीर भुजबळ माजी खासदार आहेत संघटनात्मक बांधणीचा अनुभव आहे

2) छगन भुजबळ मुंबई प्रदेशचे प्रभारी असल्यामुळे मुंबईच्या संघटनात्मक निर्णयामध्ये अडचणी येणार नाही

3) समता परिषद ही संघटना राज्यभर चालवण्याचा अनुभव आहे

4) मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असणारे गटतट मोडीत काढण्याची क्षमता समीर भुजबळ यांच्यामध्ये आहे

5) छगन भुजबळ मुंबईचे माजी महापौर आणि माजी आमदार आहेत त्यामुळे मुंबई प्रदेशची पूर्णपणे माहिती आहे

6) शिवाजीराव नलावडे यांच्या नावाला एका गटाचा विरोध होता मात्र समीर भुजबळ यांच्या नावाला कुणाचाच विरोध नाही

2019 मध्ये झाली होती नवाब मलिकांची निवड

सचिन अहिर यांनी 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करुन शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर 5 ऑगस्ट 2019 रोजी नवाब मलिक यांची राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर मनी लाँड्रिंग प्रकरणात फेब्रुवारी 2022 मध्ये अटक झाल्यानंतर नवाब मलिक तुरुंगात होते. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात त्यांना वैद्यकीय आधारावर सुप्रीम कोर्टाकडून दोन महिन्यांचा जामीन मिळाला. परंतु राष्ट्रवादीतीली फुटीनंतर आपला पाठिंबा कोणाला याबाबत त्यांनी अद्याप जाहीर केलेलं नाही.

हेही वाचा

Sameer Bhujbal : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या मुंबई अध्यक्षपदी समीर भुजबळ? आज अधिकृत घोषणेची शक्यता

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *