12 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
एकदिवसीय विश्वचषकाच्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्यात भारताचा ६ विकेट्सने पराभव झाला. त्यामुळे भारतीय संघातील सर्व खेळाडूंच्या चेहऱ्यावर अंतिम सामन्यानंतर निराशा असल्याचे दिसत होते. मोहम्मद सिराज व कर्णधार रोहित शर्मा यांना अश्रू अनावर झाले होते. तर भारतीय क्रिकेट चाहतेही आपल्या संघाच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एकीकडे भारतीय चाहते टीम इंडियाला विश्वास देत असताना दुसरीकडे खुद्द संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये काय वातावरण होतं? याबाबत एक व्हिडिओ समोर आला आहे.
Related News
रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाला विजयासाठी दिलेलं २४१ धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियानं ४ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. भारताचा पराभव झाल्यानंतर क्रिकेट चाहत्यांची मोठी निराशा झाली तर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये काही फार वेगळं वातावरण नव्हतं. आज बीसीसीआयनं त्यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममधला व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये पराभवाची निराशा प्रत्येक भारतीय खेळाडू व सपोर्ट स्टाफच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.
काय आहे व्हिडीओमध्ये?
बीसीसीआयनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये प्रत्येक सामन्यानंतर भारतीय संघाकडून उत्तम क्षेत्ररक्षणसााठी दिल्या जाणाऱ्या ‘मेडल सेरेमनी’ची दृश्य आहेत. अगदी पहिल्या सामन्यापासून अंतिम सामन्यापर्यंत. पहिल्या सामन्यात विराट कोहलीला हे मेडल देण्यात आलं होतं. अंतिम सामन्यातही विराट कोहलीचा हे मेडल देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडनंतर क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांनी सर्व खेळाडूंचं मनोबल वाढवलं.
“मित्रांनो, मला माहिती आहे की हे सगळं कठीण आहे आणि आपल्या सर्वांनाच या गोष्टीचं दु:ख होतंय. पण त्यालाच तर खेळ म्हणतात. आपण जे जे शक्य होतं, ते सगळं अगदी व्यवस्थित केलं. पण तरी सामन्याचा निकाल आपल्या बाजूने लागला नाही. पण मला वाटतं जसं राहुल द्रविडनं सांगितलं, आपल्या सगळ्यांना स्वत:चा अभिमान वाटायला हवा. मी या संघातल्या प्रत्येक खेळाडूचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो” असं दिलीप ड्रेसिंग रूममध्ये म्हणाले.
विराट कोहलीच्या कामगिरीचं कौतुक
“या संपूर्ण स्पर्धेत आपण काही सर्वोत्तम झेल पकडले. पण मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे आपण मैदानावर एकमेकांसाठी उभे राहिलो. आजचा क्षेत्ररक्षणातला विनर विराट कोहली आहे. तो एक भन्नाट खेळाडू आहे. तो स्वत: इतरांसाठी सर्वोत्तम उदाहरण घालून देतो. प्रत्येक वेळी तो मैदानावर जातो तेव्हा जादू करतो. सगळ्यात उत्तम बाब म्हणजे तो फक्त त्याची जबाबदारी पार पाडत नाही, तर त्याची कृती अनेकांना प्रोत्साहन देते”, अशा शब्दांत टी दिलीप यांनी विराट कोहलीचं कौतुक केलं.
प्रशिक्षक म्हणून खेळाडूंना असं पाहाणं फार अवघड- राहुल द्रविड
अंतिम सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडनं आपल्या भावना व्यक्त केल्या. “सर्वच खेळाडूंचा अपेक्षाभंग झाला आहे. ड्रेसिंग रुममध्ये प्रचंड भावनिक वातावरण होतं. एक प्रशिक्षक म्हणून त्या सर्वांना असं पाहाणं फार अवघड होतं. त्यांनी या स्पर्धेसाठी केलेल्या असंख्य तडजोडी आणि केलेली प्रचंड मेहनत आपण सगळ्यांनी पाहिली आहे”, असं राहुल द्रविडनं म्हटलं.