जालना7 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
जालना जिल्ह्यात सोमवारी (दि.4) सकाळी 6 वाजल्यापासून ते 17 सप्टेंबर रात्री 12 वाजेपर्यंत जमावबंदी आदेश देण्यात आला आहे. अप्पर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी यासंबंधीचे आदेश दिले आहेत.
जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर या ठिकाणची परिस्थिती बिघडली असून खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
जमावबंदीमुळे या गोष्टीवर बंदी
जमावबंदीच्या आदेशामुळे जालन्यात मराठा आरक्षणाच्या निमित्ताने विविध संघटनाकडून आत्मदहन, उपोषण, धरणे, मोर्चे, रास्ता रोको आणि राजकीयदृष्ट्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये होत असलेले आरोप प्रत्यारोप लक्षात घेता कलम (37)1 अन्वये सार्वजनिक ठिकाणी शस्त्रे, लाठ्या, बंदूक, तलवारी, भाले, चाकू आणि शरीरास इजा अथवा अपाय करणाऱ्या वस्तू बाळगता येणार नाहीत. तसेच दगड एकत्रित गोळा करून ठेवता येणार नाही, जवळ बाळगता येणार नाहीत.
व्यक्ती किंवा त्याच्या प्रतिकात्मक शवाचे प्रदर्शन करता येणार नाही. भाषणातून व्यक्तीच्या किंवा समूहाच्या भावना दुखावता येणार नाहीत, गाणे किंवा वाद्याच्या माध्यमातून कोणाच्या भावना दुखवता येणार नाहीत. आवेशपूर्ण भाषण, अंगविक्षेप अराजक माजेल अशी चित्रे ,निशाणे, घोषणापत्रे वस्तू बाळगता येणार नाहीत.
श्रीकृष्ण जयंती, मुक्तीसंग्राम कार्यक्रम
जालन्यात लागू केलेल्या जमावबंदीच्या आदेशामुळे 6 तारखेची श्रीकृष्ण जयंती, 7 तारखेचा गोपाळकाला आणि 14 तारखेच्या पोळा तसेच 17 सप्टेंबरच्या दिवशी मुक्तीसंग्राम दिनानिमित्त निघणाऱ्या मिरवणुका आणि इतर कार्यक्रम रद्द करावे लागणार आहेत.
हे ही वाचा
मविआच्या काळात मराठा समाजाचे आरक्षण गेले:समाजकंटक जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करतायत – एकनाथ शिंदे

शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुलढाणा येथे आले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी मराठा आंदोलनावर भाष्य केले. शुक्रवारची घटना दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. महाविकास आघाडीच्या काळातच मराठा समाजाचे आरक्षण गेले. जालन्यामध्ये दगडफेक कोणी केली हे पाहावे लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे. – येथे वाचा संपूर्ण बातमी