मुंबई; महातंत्र वृत्तसेवा : कांदिवली पुर्वकडील लोखंडवाला-ठाकूर व्हिलेजला जोडणाऱ्या १२० फूटी विकास नियोजन रस्ता (डिपी) रोडवरील वाहने सध्या सिंग इस्टेटमधील रहिवाशांसाठी धोकादायक ठरत आहेत. सोमवारी सायकाळी ६ वाजेच्या दरम्यान या रोडवरून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराने थेट नागरिकाच्या घरात दुचाकी घुसविण्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. सुदैवाने ही भरधाव दुचाकी घराच्या भिंतीला आदळल्याने मोठी जिवितहानी टळली. अन्यथा घरातील नागरिकांचा नाहक बळी गेला असता. या दुर्घटनेमुळे संतप्त झालेल्या स्थानिक रहिवाशांनी बिल्डर, पालिका आणि लोकप्रतिनिधीविरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.
येथील १२० फूटी रोड हा महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतून निघालेला आहे. तो सुरु करण्यासाठी पालिका आर.दक्षिण विभाग आणि भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी जुलै महिन्यामध्ये महिंद्रा कंपनीची संरक्षण भिंत तोडली होती. तेव्हापासून या रस्त्याहून दररोज मोठ्या प्रमाणात दुचाकीस्वारांची वर्दळ वाढलेली आहे. यामुळे डीपी रोड समोरील घरांसह रोड नं.२ मधील घरांना आणि लहान मुले, वयोवृध्दांना आपला जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. या वाढत्या वाहनांमुळे यासर्वांची सुरक्षा धोक्यात आली असून याकडे पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष असल्याने भविष्यात या दुर्घटनेमुळे नागरिकांचा नाहक बळी जावू शकतो, अशी भीती स्थानिक रहिवासी सचिन नांदगावकर यांनी व्यक्त केली आहे.
बाधित ३५० घरांचे पुनर्वसन कधी, कुठे?
येथील डीपी रोड नागरिकांसाठी खुला तर केला, मात्र या रोडच्या समोरील सुमारे ३५० घरे ही बाधित आहेत. या बाधित झोपडीधारकांना पर्यायी घरे कधी, कुठे देणार याचे कुठलेही पालिका आर.दक्षिण विभाग आणि लोकप्रतिनिधीकडे नियोजन नाही, मात्र तो खुला करून सिंग इस्टेटमधील नागरिकांच्या जीवांशी खेळले जात असून त्यांच्या जखमांवर मिठ चोळले जात असल्याची खंत स्थानिक रहिवासी अमर पन्हाळकर यांनी व्यक्त केली.