जयसिंगपूर: महातंत्र वृत्तसेवा: मागील ४०० रुपये व ऊस दराची कोंडी अद्याप फुटलेली नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नृसिंहवाडी-शिरोळ मार्गावरील हनुमान मंदिराजवळ दत्त साखर कारखान्याची सुरू असलेली ऊसतोड बंद पाडली. त्यानंतर संघटनेचे कार्यकर्ते व कारखान्याचे समर्थक यांच्यात किरकोळ बाचाबाची झाली.
दरम्यान, चिकोडी (जि. बेळगाव) राज्यातून शिरोळ मार्गे जाणारी साखर वाहतूक घेऊन जाणारा ट्रक रोखून संतप्त कार्यकर्त्यांनी ट्रकच्या काचा फोडून टायर फोडले. ट्रकमधील पाच पोती साखर रस्त्यावर फेकली. या सर्व प्रकारामुळे प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, याबाबत शिरोळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, अद्याप ऊस दराची कोंडी फुटलेली नाही. अशातच उसाच्या तोडी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे स्वाभिमानीचे पंचायत समितीचे माजी उपसभापती सचिन शिंदे, नगरसेवक प्रकाश गावडे, विशाल चौगुले, राहुल सूर्यवंशी, अनिल दानोळे, बाळू मानकापुरे, प्रदीप चव्हाण, उत्तम माळी, अनिल चव्हाण यांच्यासह आणि कार्यकर्त्यांना ऊसतोड सुरू असल्याची माहिती मिळताच त्यांनी मागील ४०० रुपये चा दुसरा हप्ता दिल्याशिवाय ऊसतोड करू नये अशी मागणी केली.
दरम्यान, दत्त कारखान्याचे संचालक दरगु गावडे, श्री गुरुदत्त साखर कारखान्याचे संचालक शिवाजीराव माने देशमुख, बाजार समितीचे संचालक रामदास गावडे, गुरुदत्त चे संचालक शिवाजीराव सांगळे, नगरसेवक श्रीवर्धन माने देशमुख, निलेश गावडे, अन्य कार्यकर्ते यांच्यामध्ये किरकोळ बाचाबाची झाली.
याच दरम्यान, साखर भरून जाणारा ट्रक जात असताना कार्यकर्त्यांनी ट्रकची काच फोडून ट्रकमधील साखर रस्त्यावर फेकून दिली. शेकडो कार्यकर्ते आक्रमक झाल्याने शिरोळ नृसिंहवाडी मार्गावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर घटनास्थळी शिरोळ पोलीस ठाण्याचा फौजफाटा दाखल झाल्यानंतर तणाव निवळला. या घटनेची वर्दी दीपक सावंत (रा. शेगाव ता.जत) यांनी शिरोळ पोलिसात दिली आहे. तर यात अंदाजे सव्वा लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिडे करीत आहेत.
हेही वाचा