जयसिंगपूर : संतोष बामणे : काळ भैरवनाथच्या नावानं चांगभलं… बिरोबाच्या नावानं चांगभलं…च्या गजरात नांदणी (ता.शिरोळ) येथील श्री काळ भैरवनाथ देवाचा पालखी सोहळा रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास संपन्न झाला. या यात्रेनिमित्त दोन सासनकाठ्या व श्री कालभैरवनाथ व श्री बिरोबा देवाची पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी हजारो भाविकांनी गुलाल व खोबऱ्याची उधळण केली. तर दिवसभर भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.
नांदणी येथील ग्रामदैवत श्री कालभैरवनाथ देवाच्या यात्रेच्या मुख्य दिवशी रविवारी पालखी सोहळा संपन्न झाला. यात्रेनिमित्त नांदणी येथील श्री भैरवनाथ, श्री बिरोबा व २ सासनकाठ्या चिपरी माळावरील श्री मंगोबा मंदिरात रविवारी सकाळी गेल्या होत्या. सायंकाळी पाचच्या सुमारास नांदणी गावात पुन्हा या पालख्या आल्यानंतर गुलाल, भंडारा व खोबऱ्याची उधळण करीत पालखी व सासनकाठ्याचे स्वागत जल्लोषात करण्यात आले.
त्यानंतर सनईचा सूर, हलगीचा कडकडाट, गुलाल उधळत गावातील मुख्य मार्गावरून पालख्या व सासनकाठ्या मंदिरात आल्या. त्यानंतर हजारो भाविकांच्या उपस्थित काळ भैरवनाथच्या नावानं चांगभलं… बिरोबाच्या नावानं चांगभलं…च्या गजरात पालखी व सासनकाठ्या मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात आले. यावेळी भाविकांनी गुलाल व खोबऱ्याची उधळण केली. दिवसभरात माजी खासदार राजू शेट्टी, दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील, गणेश बेकरीचे चेअरमन अण्णासाहेब चकोते, जयसिंगपूरचे माजी उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी श्री भैरवनाथाचे दर्शन घेतले.
यात्रेनिमित्त लाखो रुपयांची उलाढाल झाली. दरम्यान इचलकरंजी ते नांदणी मार्गे जयसिंगपूर असणाऱ्या सर्व एसटी बसेस गर्दीने फुल्ल भरून येत असल्याने यात्रेत येणाऱ्या पाहुणे व नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली होती. त्यामुळे खासगी वाहनाचा आधार द्यावा लागला. दिवसभरात शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. त्याचबरोबर सरपंच संगीता तगारे व उपसरपंच अजय कांरडे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व यात्रा कमिटीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी यात्रेनिमित्त नेटके नियोजन केले होते.