कुडाळ; महातंत्र वृत्तसेवा : सरकार मराठा समाजाच्या एकीमध्ये फूट पडण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे मराठा समाजाचे आक्रमक नेतृत्व मनोज जारांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि फसवणूक करणाऱ्या सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी, समाजाचे फसवणुकीकडे लक्ष वेधण्यासाठी, तसेच सरकारने मराठा समाजामध्ये फोडाफोडीचे जे राजकारण चालवले आहे, याकडे समाजाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवार दिनांक २ नोव्हेंबर २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग समोर अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग तर्फे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. तसेच जिल्हाभरात गावागावात उपोषणे करण्यात येणार आहेत अशी माहीती अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष तथा मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हा समन्वयक अॅड.सुहास सावंत यांनी दिली. मराठा समाजाची फसवणूक करणा-या सरकारचा अखिल भारतीय मराठा महासंघ जाहीर निषेध करीत असल्याचेही अॅड.सावंत यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. सरकारकडून सकारात्मक तोडगा काढला जात नसल्याने मराठा समाज आक्रमक झाला असून, राज्यभरात आंदोलने चिघळली आहेत. सिंधुदुर्गातही मराठा समाज बांधव आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणाची हाक दिली आहे.
ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत. त्यांना तात्काळ दाखले देऊ असे मुख्यमंत्री यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. ज्यांच्या कडे कुणबी नोंदी आहेत त्यांना पहिल्या पासूनच दाखले भेटत आहेत.जे आधी होत तेच दिले, मग ४० दिवसात केले काय? आणि विशिष्ट गटाला असलेलं आरक्षण पुन्हा घोषित करायचे आणि त्यांना शांत करायचे आणि मग महाराष्ट्रातील बाकीच्या समाजाचं काय?त्यांच्या तोंडाला पाने पुसायची. असे करून सरकार मराठा समाजाच्या एकीमध्ये फूट पडण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे मराठा समाजाचे आक्रमक नेतृत्व मनोज जारांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि फसवणूक करणाऱ्या सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी गुरुवार दिनांक २ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग समोर अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग तर्फे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. यावेळी जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अॅड.सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. तसेच जिल्ह्यातील इतर गावांमध्ये सुद्धा मराठा समाज बांधवांनी रॅलीचे आयोजन करून समाजाचे प्रबोधन करावे आणि मनोज जारांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी गावागावात ठिकठिकाणी उपोषणे करावी असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष ॲड. सावंत यांनी केले आहे.