भारत ‘6 जी’ तंत्रज्ञानात जगाचे नेतृत्व करेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी | महातंत्र

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोट्यवधी लोकांचे जीवनमान बदलण्याची क्षमता तंत्रज्ञानात आहे. भारतात ‘5 जी’ सेवेचा विस्तार झपाट्याने होत आहे. देश ‘6 जी’ तंत्रज्ञानाच्या दिशेने पावले टाकत आहे. येणार्‍या काळात ‘6 जी’ तंत्रज्ञानात भारत जगाचे नेतृत्व करेल, असा दुर्दम्य विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी व्यक्त केला. सातव्या भारतीय मोबाईल काँग्रेसच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

भारत मंडपमच्या भव्य संकुलात 27 ते 29 ऑक्टोबर या कालावधीत होत असलेल्या सातव्या भारतीय मोबाईल काँग्रेसचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा विकासक, उत्पादक आणि निर्यातदार अशी ओळख बनलेल्या भारताला मोबाईल तंत्रज्ञानात अव्वल बनवण्याची गरज यावेळी पंतप्रधानांनी व्यक्त केली. ते म्हणाले, 21 व्या शतकात जग झपाट्याने बदलत असताना त्यावर काँग्रेस होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. कोट्यवधी लोकांचे जीवनमान बदलण्याची क्षमता तंत्रज्ञानात आहे. भारताने अत्यंत गतीने ‘5 जी’ सेवेचा विस्तार बघितला आहे. वर्षभराच्या काळात देशात ‘5 जी’ची 4 लाख बेस स्टेशन्स उभारली गेली. आज जगात मोबाईल ब्रॉडबँड स्पीडच्या बाबतीत भारत 118 व्या स्थानावरून 43 व्या स्थानावर पोहोचला आहे. रोज तंत्रज्ञानात होत असलेले बदल पाहता भविष्य येथे आणि आताच आहे याची मला खात्री आहे. आज भारतात ‘5 जी’ सेवेचा विस्तार झपाट्याने होत आहे. भारत ‘6 जी’च्या दिशेनेही दमदार वाटचाल करीत आहे. येणार्‍या काळात ‘6 जी’ तंत्रज्ञानात भारत जगाचे नेतृत्व करेल, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.

यूपीए सरकारवर टीका

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात यूपीए सरकारवरही टीका केली. ते म्हणाले की, 2014 मध्ये आपले सरकार आले. 2014 हा फक्त वर्षाचा आकडा नाही; तर ते परिवर्तन आहे. कालबाह्य झालेल्या फोनच्या स्क्रीनवर कितीही बोटे फिरवली, बटणे दाबली तरी काहीही होत नाही. आधीचे सरकार अशा निष्क्रिय अवस्थेत होते. रिस्टार्ट किंवा बॅटरी चार्ज करणे किंवा अगदी बॅटरी बदलूनही काही झाले नाही. मग 2014 मध्ये लोकांनी असे कालबाह्य फोन फेकून दिले आणि आम्हाला देशसेवेची संधी दिली.

जग वापरते ‘मेड इन इंडिया’ फोन

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात गुगलच्या घोषणेचा उल्लेख करताना म्हटले की, गुगलने त्यांच्या पिक्सेल या फोनचे उत्पादन भारतात करण्याची घोषणा केली आहे. सॅमसंगच्या फोल्ड 5 या आणि अ‍ॅपलच्या आयफोन 15 चे उत्पादन भारतात होत आहे. त्यात आता पिक्सेल फोनची भर पडली आहे. अवघे जग आता ‘मेड इन इंडिया’ फोन वापरत आहे याचा आपल्याला अभिमान आहे, असेही मोदी म्हणाले.

आता टाटांचा आयफोन

बंगळूर : तैवानच्या विस्ट्रॉन कॉर्प कंपनीने बंगळूरमधील आयफोन निर्मिती प्रकल्प टाटा समूहाला विकण्याची मान्यता दिली असून हा करार पूर्णत्वाला आल्यावर टाटा भारतात आयफोनची निर्मिती करू शकेल. 125 दशलक्ष डॉलर्सचा हा सौदा असून तो लवकरच पूर्ण केला जाणार आहे.ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, आयफोन निर्मिती करणार्‍या फॉक्सकॉन, पेगाट्रॉन आणि विस्ट्रॉन कॉर्प या तीन प्रमुख कंपन्या तैवानी आहेत. यापैकी पेगाट्रॉन आयफोन निर्मितीतून बाहेर पडली. आता विस्ट्रॉन देखील भारतातील प्रकल्प टाटांना विकणार आहे. दुसरीकडे टाटा समूहाने होसूर येथील कंपनीत भरती प्रक्रिया सुरू केली आहे.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *