महाड: महातंत्र वृत्तसेवा : महाड तालुक्यातील दासगाव ते गोठे या खाडेपट्ट्याला जोडणाऱ्या नियोजित पुलाच्या जागेची पाहणी महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी केली. या पुलामुळे रायगड, रत्नागिरी, सातारा जिल्हा जोडला जाणार आहे. तर महाड, पोलादपूर मंडणगड, दापोली तालुके जोडले जाणार आहेत.
पूर्वी दासगाव ते करंजाडी अंतर 28 किमी होते. व ते पार करताना महाड शहराला वळसा घालवा लागत होता. परंतु या नियोजित पुलामुळे अंतर 7 किमीने कमी होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील खुटील, तुडील, सोनघर, वलंग, वामणे, रावढळ, कोसंबी, सव, गोठे, चोचिंदेसह इतर गावांची वाहतूक सुकर होणार आहे. या पुलामुळे मुंबई येथे जाण्यासाठी 20 किमी अंतर कमी होणार आहे.
आमदार गोगावलेंसोबत या नियोजित पुलाच्या जागेची पाहणी करण्यासाठी शासनाचे संबंधित विभागाचे अधिकारी त्याचप्रमाणे महाड पूर निवारण समितीचे प्रा.डॉ. समीर बुटाला, माजी पाटबंधारे अभियंता प्रकाश पोळ उपस्थित होते.
गोगावले यांनी मतदारसंघात 150 कोटींचा भरघोस निधी आणला आहे. प्रामुख्याने महाड शहराला जोडणाऱ्या गांधारी पूलासाठी 7 कोटी तर दादली पुलासाठी 30 कोटी रुपये मंजूर करून आणल्याचे देखील त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच दासगाव ते गोठे पुलाच्या कामाची पूर्वप्रक्रिया येत्या तीन महिन्यात पूर्ण केली जाईल. पावसाळ्यानंतर काम सुरू करण्याचा प्रयत्न असेल, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा