‘काकांच्या मेहनतीवर ‘डल्ला’ मारण्याऐवजी…’, ‘भाजपाच्या पलंगावर…’; अजितदादांवर हल्लाबोल

Uddhav Thackeray Group Slams Ajit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमधील आपल्या भाषणामध्ये केलेल्या, ‘मला सत्तेची हाव नाही. मी सत्तेसाठी हपापलेला कार्यकर्ता नाही’ या विधानावरुन उद्धव ठाकरे गटाने जोरदार टीका केली आहे. अजित पवार हे चार वेळा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर कधी बारामतीच्या होमग्राऊंडवर स्वतःचे अशा पद्धतीने स्वागत करून घेतल्याचे दिसले नाही अशी आठवण ठाकरे गटाने ‘सामना’च्या अग्रलेखातून करुन दिली आहे. तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उदात्त विचाराने पक्षाबाहेर पडलेले नाहीत तर ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय वगैरेंच्या चौकश्या नकोत या भयाने त्यांनी गुडघे टेकलेत हे बारामतीकरांना ठाऊक असल्याचंही ठाकरे गटाने म्हटलं आहे.

‘शाहू, फुले, आंबेडकरांचे हे विचार नक्कीच नाहीत’

“विकासासाठी आपण शिंदे-फडणवीस यांच्याबरोबर गेल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. हा दावा पोकळ आणि बिनबुडाचा आहे. अजित पवार यांना विकासाची हौस आहे हे मान्य, पण गेली अनेक वर्षे सत्तेत असताना त्यांनी विकासाचे असे कोणते इमले रचले? बारामतीत जाऊन अजितदादा असेही म्हणाले की, ‘‘मला सत्तेची हाव नाही. मी सत्तेसाठी हपापलेला कार्यकर्ता नाही. शाहू, फुले, आंबेडकर अशा महान विभूतींचे विचार आपण पुढे नेणार आहोत’’. मुळात महाराष्ट्रासह देशात धार्मिक तणाव निर्माण करून दंगली घडविणे हा भाजपाचा एककलमी कार्यक्रम आहे. लोकांना धर्माच्या, जातीच्या नावावर झुंजवायचे हा काही शाहू, फुले, आंबेडकर यांचा विचार नव्हता. शाळांतून द्वेषाचे धडे कसे दिले जात आहेत ते उत्तर प्रदेशातील एका प्रकरणावरून उघड दिसते. शिक्षिकेच्या सांगण्यावरून मुस्लिम विद्यार्थ्यास शाळेतल्या त्याच्या वर्गमित्रांनी बेदम मारहाण केली. असे विष आज समाजात सर्वत्र पसरवले जात आहे व हे शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार नक्कीच नाहीत,” असा टोला ठाकरे गटाने अजित पवारांच्या विधानाचा संदर्भ घेत भाजपाला लगावला आहे.

अजित पवारांना सत्काराचे वेड जडले

“आज सर्वच पातळ्यांवर संविधानाची मोडतोड करून एक प्रकारे हुकूमशाही पद्धतीने कारभार चालला आहे. त्यामुळे भाजपासोबत गेलेले अजित पवार हे डॉ. आंबेडकरांचा कोणता विचार पुढे नेऊ इच्छितात हे त्यांनी महाराष्ट्राला खुलेपणाने सांगायला हवे. शनिवारी बारामतीत अजित पवार यांचे जंगी स्वागत झाले. बारामतीच्या होमग्राऊंडवर अशा स्वागताचा थाटमाट करून घ्यावा असे अजित पवार यांना का वाटावे? आतापर्यंत किमान चारवेळा अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले व शरद पवार यांच्या कृपेने त्यांना ही सर्व सत्तेची पदे मिळत गेली. त्यावेळी अजितदादांनी होमग्राऊंडवर स्वतःचे अशा पद्धतीने स्वागत करून घेतल्याचे दिसले नाही. उलट त्यांनी कार्यकर्त्यांना जरबेत सांगितले की, ‘‘सत्कार, हारतुरे  वगैरे नकोत. कामाला लागायचे आहे.’’ पण भाजपाच्या पलंगावर गेल्यापासून अजित पवारांना सत्काराचे वेड जडले आहे,” असा टोला ‘सामना’च्या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

Related News

काकांच्या मेहनतीवर ‘डल्ला’ मारण्याऐवजी…

“महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही अजित पवार यांची फिरकी घेतली आहे. ‘‘अजित पवार यांना कितीही वेळा उपमुख्यमंत्री होण्यास सांगा, ते कायम तयार असतात. मला त्यांची दया येते.’’ कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या नेत्यांची अशी खिल्ली उडवू नये. महाराष्ट्राच्या राज्यपालपदावर बसून त्यांनी राजकारण केले. तो त्यांचा कंडू अद्यापि शमलेला दिसत नाही. अजित पवार यांनी भगतसिंहांना चोख उत्तर द्यायला हवे, पण तेवढे बळ त्यांच्यात आहे काय? भाजपा जे लिहून देईल त्याच अजेंड्यावर त्यांना काम करायचे आहे व शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार त्या अजेंड्यावर नाहीत. पुन्हा कोश्यारी यांना अजित पवार यांची दया येते, पण फौजदाराचे हवालदार झालेल्या देवेंद्र फडणवीस यांची दया येत नाही. अजित पवार यांचे जे सांगणे आहे की, मला सत्तेची हाव नाही. ते खरे असेल तर त्यांनी आमदारांना गोळा करून आपल्या काकांचा पक्ष का फोडला? जो पक्ष काकांनी स्थापन केला त्याच काकांना पक्षाच्या अध्यक्षपदावरून का हाकलले? आता सुनील तटकरे यांनी जाहीर केले आहे की, ‘‘अजित पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष आहेत,’’ सत्तेची हाव नसल्याचे हे लक्षण अजिबात नाही. अजित पवार यांना ‘हाव’, ‘भूक’ नसती तर त्यांनी सरळ राजकारण संन्यास घेऊन कृषी, सामाजिक कार्यात झोकून दिले असते व ते जर प्रामाणिक, स्वाभिमानी राजकारणी असते तर काकांच्या मेहनतीवर ‘डल्ला’ मारण्याऐवजी स्वतःचा नवीन जागतिक पक्ष स्थापन करून वेगळे राजकारण केले असते, पण अजित पवारांना सर्वच आयते मिळाले,” असा टोला ठाकरे गटाने लागवला आहे.

शिंदे व अजित पवार उदात्त विचाराने बाहेर पडलेले नाहीत

“एकनाथ शिंदे यांच्याकडून भाजपाने जे अचाट, पण बुळेगिरीचे काम करून घेतले तेच काम अजित पवारांकडून करून घेतले. मुळात शिवसेना ही जशी मिंधे गटाची नाही तसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही अजित पवार गटाचा नाही. शिवसेना फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचाच आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा शरद पवार यांचाच पक्ष राहू शकतो. मात्र भाजपाने त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी ‘घाव’ घातला म्हणून तुमची ही सत्तेची ‘हाव’ पूर्ण झाली आहे, हे या पक्षांवर बेगडी दावा सांगणाऱ्यांनी लक्षात घ्यावे. तेव्हा आपल्याला सत्तेची हाव नाही वगैरे अजित पवारांचे बोलणे झूठ आहे. शिंदे व अजित पवार हे कोणत्याही उदात्त विचाराने पक्षाबाहेर पडलेले नाहीत तर ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय वगैरेंच्या चौकश्या नकोत या भयाने त्यांनी गुडघे टेकले हे बारामतीत त्यांच्यावर फुले उधळणारी जनताही जाणते,” असं या लेखात म्हटलं आहे.

‘‘आज कपाटात गेलेल्या फाइली पुन्हा…”

“प्रश्न राहिला विकासाचा वगैरे. शिंदे-अजित पवारांच्या विकासाच्या व्याख्या म्हणजे महाराष्ट्राच्या तिजोरीची फसवणूक आणि लूट आहे. आपापल्या गटातील फुटीर आमदारांनाच कोट्यवधीचा निधी द्यायचा व त्या निधीच्या कमिशनबाजीतून महाराष्ट्रात बेइमानाचे बीज वाढवायचे. जे आमदार आपल्या गटात नाहीत त्यांना त्यांच्या मतदारसंघाच्या विकासासाठी एक फुटकी कवडी द्यायची नाही, तेथील मतदारांना विकासापासून दूर ठेवायचे अशी बनवाबनवी राज्याचे मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री करीत आहेत. आता हा विकास आहे असे जर अजित पवारांना वाटत असेल तर ते शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा घोर अपमान करीत आहेत. सत्तेच्या मस्तवालपणातून जमा केलेल्या गडगंज इस्टेटीवर ईडी, इन्कम टॅक्सचे मुंगळे चढले. ते मुंगळे डसू लागल्यावर भाजपाच्या गोठ्यात शिरणाऱ्यांनी एक लक्षात ठेवले पाहिजे की, 2024 मध्ये नक्कीच सत्ताबदल होत आहे व शरद पवार म्हणतात त्याप्रमाणे ‘‘आज कपाटात गेलेल्या फाइली पुन्हा टेबलावर येतील.’’ महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या बेइमानांना तेव्हा दया नसेल! सत्तेची भूक तोपर्यंत सगळ्यांनीच शमवून घ्यावी हाच सगळ्यांना प्रेमाचा सल्ला!,” असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *