‘हे फार दुर्दैवी आहे’, गौतम गंभीरचं फायनलआधी मोठं विधान, म्हणाला ‘सोशल मीडियावर फॉलोअर्स आहेत म्हणजे….’

वर्ल्डकपच्या सेमी-फायनल सामन्यात श्रेयस अय्यरने केलेल्या तुफान फलंदाजीने भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीर चांगलाच प्रभावित झाला आहे. श्रेयस अय्यरने फक्त 70 चेंडूत 105 धावा करत संघाला 397 धावांचा डोंगर उभा करण्यात मदत केली. याच सामन्यात विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमधील 50 शतकं ठोकली. तर दुसरीकडे मोहम्मद शमीने 7 विकेट घेत इतिहास रचला. मोहम्मद शमीला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार देण्यात आला. विराट कोहली आणि मोहम्मद शमीमुळे श्रेयस अय्यरच्या खेळीकडे चाहत्यांचं दुर्लक्ष झालं. 

गौतम गंभीरने श्रेयस अय्यरने खऱ्या अर्थाने हा सामना जिंकवला असल्याचं म्हटलं आहे. पण त्याला त्याचं हवं तितकं श्रेय मिळत नसल्याचंही गंभीरने म्हटलं आहे. “मी याआधी हे जाहीरपणे सांगितलं असून, आता पुन्हा सांगत आहे. न्यूझीलंडविरोधातील सामन्यात तो गेमचेंजर होता. त्याचे बहुतेक सोशल मीडियावर तितके फॉलोअर्स नाहीत, त्यामुळे त्याचं हवं तितकं कौतुक होताना दिसत नाही,” असा टोला गंभीरने लगावला आहे. 

“श्रेयस अय्यर त्याचा पहिला वर्ल्डकप खेळत आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली फार अनुभवी असल्याने त्यांनी चांगली खेळी करण्याची सर्वांची अपेक्षा असते. विराट कोहली त्याचा चौथा वर्ल्डकप खेळत आहे. रोहित 3 खेळला आहे. श्रेयसचा मात्र हा पहिलाच आहे,” असं गंभीर म्हणाला आहे.

Related News

“त्याचं इतरांइतकं कौतुक होत नाही हे फार दुर्दैवी आहे. श्रेयस अय्यरने अविश्वसनीय फलंदाजी केली आहे. त्याने विराट कोहलीवर दबाव येऊ दिला नाही. धावसंख्या 350 वरुन 390 वर जाण्याला श्रेयस अय्यर जबाबदार आहे. जर धावसंख्या 350 असती तर भारतीय संघावर किती दबाव आला असता याचा विचार करा”, असं गंभीरने सांगितलं आहे. श्रेयस अय्यरने सलग 2 सामन्यात शतकं ठोकली आहेत. याआधी त्याने नेदरलँडविरोधात 128 धावा केल्या होत्या. 

श्रेयस अय्यरला वर्ल्डकपच्या सुरुवातीला फार टीका सहन करावी लागली होती. ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्याच सामन्यात श्रेयस अय्यर शून्यावर बाद झाला होता. यानंतरच्या पुढील दोन सामन्यात त्याने 25 आणि 53 धावा करत सर्वांना निराश केलं होतं. सुरुवात चांगली केल्यानंतर श्रेयस अय्यर मोठ्या धावसंख्येत रुपांतर करण्यात अपयशी ठरत असल्याची टीका त्याच्यावर होऊ लागली होती. यानंतर बांगलादेश, न्यूझीलंड आणि इंग्लंडविरोधातील सामन्यात त्याने 19, 33 आणि 4 धावा केल्या. श्रेयस अय्यरला शॉर्ट-पिच डिलिव्हरी खेळताना अडचण होत असल्याने अनेकांनी चिंता व्यक्त केली होती.  

पण श्रेयस अय्यरने आपल्या बॅटनेच सर्व टीकाकारांना उत्तर देत तोंड बंद केलं आहे. यानंतरच्या पुढील चारही सामन्यात श्रेयस अय्यरने 50 पेक्षा अधिक धावा केल्या. श्रीलंकेविरोधात 82, दक्षिण आफ्रिकेविरोधात 77 आणि नेदरलँड, न्यूझीलंडविऱोधात त्याने शतक ठोकलं. न्यूझीलंडविरोधात स्फोटक फलंदाजी केल्यानंतर श्रेयस अय्यरने आपल्यावर सतत होणाऱ्या टीकेमुळे संतापलो होतो असा खुलासा केला आहे. 

‘मी अजिबात दाखवत नव्हतो, पण आतून इतका…,’ श्रेयस अय्यरचा खुलासा

“वर्ल्डकपच्या सुरुवातीला पहिल्या एक-दोन सामन्यात मी चांगली कामगिरी करु शकलो नाही. मला सुरुवात चांगली मिळत होती. पण मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरत होतो. पण तुम्ही आकडे पाहिले तर अफगाणिस्तान आणि पाकिस्तानविरोधात मी नाबाद होतो. नंतर दोन सामने चांगला खेळ झाला नाही. यानंतर लोक माझ्यात समस्या आहे असं बोलू लागले. मी आतून फार संतापलो होतो. मी ते दाखवत नव्हतो. पण वेळ येईल आणि मी स्वत:ला सिद्ध करेन हे मला माहिती होतं. आणि आता ती योग्य वेळ आली आहे,” असं श्रेयस अय्यर म्हणाला आहे.



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *