तर ठरलं! छगन भुजबळांना जालन्यातूनच उत्तर मिळणार, मनोज जरांगेंच्या भव्य सभेचं आयोजन

जालना : जिल्ह्यातील अंबडच्या सभेतून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या टीकेला जशास तसे उत्तर देण्यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची देखील आता जालन्यात (Jalna) भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे. येत्या 1 डिसेंबर रोजी जालना शहरात ही सभा होणार आहे. याबाबतच्या पूर्वतयारीसाठी शनिवारी (18 नोव्हेंबर) जालना शहरातील मातोश्री लॉन्समध्ये सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाची बैठक पार पडली. यावेळी 1 डिसेंबर रोजी जालना शहरातील आझाद मैदानात जरांगे यांच्या भव्य सभा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे या सभेतून जरांगे हे भुजबळ यांच्या टीकेला उत्तर देणार असल्याचे बोलले जात आहे. 

मराठा आरक्षणावरून मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यातील वाद आता आणखीनच वाढतांना पाहायला मिळत आहे. ज्या जालन्यातून मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठीची लढाई सुरु केली, त्याच जालन्यात ओबीसी सभा घेत भुजबळ यांनी जरांगे यांना आव्हान दिले. त्यामुळे आता भुजबळ यांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी त्याच जालन्यात जरांगे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. 1 डिसेंबर रोजी जालना शहरातील आझाद मैदानात ही सभा होणार आहे. 

Related News

सभेतून भुजबळांना उत्तर देणार…

मनोज जरांगे यांच्या अनेक जिल्ह्यात सभा झाल्या आहेत. यापूर्वी आंतरवाली सराटीत राज्याची सभा झाली. पण जालना जिल्ह्यासाठीची जरांगे यांची अजूनही एकही सभा झाली नाही. त्यातच, जालना जिल्ह्यात येऊन भुजबळ यांनी जरांगे यांच्यावर हल्लाबोल करत टीका केली आहे. त्यामुळे आता जरांगे यांची जालना शहरात सभा घेण्याची तयारी सुरु होती, आणि यासाठी शनिवारी एक बैठक पार पडली. या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांच्या नियोजित सभेच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ज्यात 1 डिसेंबर रोजी भव्य अशी सभा आयोजित करण्याचा निर्णय झाला. 

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये बैठका घेणार 

या सभेस मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहावेत, यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये बैठका घेणार आहे. मनोज जरांगे पाटलांची जालना शहरात आयोजित ही सभा मराठा समाजाच्या न्याय मागण्यासाठीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एक मैलाचा दगड ठरणार असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. शहरात आयोजित या सभेच्या दिवशी व्यापारी बांधवांचे नुकसान होऊ नये याकरीता कुठल्याही बंदचे आवाहन करण्यात येणार नाही. सभेपूर्वी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून भव्य रॅलीही रॅली काढण्यात येईल. जिल्ह्यात व शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाईल याबाबतचे नियोजन सदर बैठकीत करण्यात आले. या बैठकीस मराठा समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Bachchu Kadu : गेल्या 70 वर्षांत ओबीसी नेत्यांनी समाजासाठी काय केलं? आमदार बच्चू कडू यांचा ओबीसी नेत्यांवर निशाणा

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *