जालन्यातील लाठीचार्ज प्रकरण तापले! संभाजीराजेंनी फडणवीसांकडे मागितला खुलासा | महातंत्र








महातंत्र ऑनलाईन डेस्क : जालनामध्ये मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना शुक्रवारी (दि. १ सप्टेंबर) घडली. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज करत हवेत गोळीबार केला. यामध्ये पोलिसांनी बळाचा वापर केल्याने अनेकजण जखमी झाले आहेत. या घटनेचे पडसाद आता राज्यभर उमटताना दिसत आहे. माजी खासदार संभाजीराजे (Sambhajiraje) यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिलेली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर टीका करत त्यांनी या प्रकरणाचा खुलासा करा अशी मागणी केली आहे.

माजी खासदार संभाजीराजे यांनी ट्विटर जालन्यातील घटनेचा निषेध करत एक ट्विट केलेल आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संविधानिक मार्गाने आंदोलनास बसलेल्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेराव घालत अमानुष लाठीचार्ज केला आणि शांततेच्या मार्गाने आपले हक्क मागण्यासाठी जमलेल्या मराठा समाज बांधवांस पांगवण्यासाठी गोळीबार केला. हे कृत्य अत्यंत निंदनीय असून कुणाच्या आदेशाने हे सर्व घडले याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ खुलासा द्यावा, अन्यथा तुम्हाला समाजाच्या रोषास सामोरे जावे लागेल. मराठा समाजाला दिलेल्या या अमानुष वागणूकीमुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वथा राज्याचे गृहमंत्री व सरकार जबाबदार असेल, असं संभाजीराजे म्हणाले आहेत.









Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *