कोल्हापूर : कोल्हापूर परिक्षेत्रांतर्गत पाचही जिल्ह्यांत गंभीर गुन्ह्यांचा वाढता टक्का धक्कादायक आहे. जानेवारी ते सप्टेंबर 2023 या 270 दिवसांत 207 खुनांसह 238 अभागिनी वासनेच्या शिकार ठरल्या आहेत. 968 पीडितांना विनयभंगाच्या घटनांना सामोरे जावे लागले आहे.
कोल्हापूर परिक्षेत्रांतर्गत कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर व पुणे या जिल्ह्यांत अलीकडच्या काळात नामचिन टोळ्यांसह माफिया, समाजकंटकांनी धुमाकूळ घातला आहे. दहशतीच्या बळावर होणार्या या कृत्यांमुळे महिला असुरक्षित बनल्या आहेत.
जानेवारी ते सप्टेंबर 2023 या काळात कोल्हापूर परिक्षेत्रात तब्बल 238 बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये कोल्हापूर 46, सांगली 45, सातारा 30, सोलापूर ग्रामीण 45, पुणे ग्रामीण 79 घटनांचा समावेश आहे. याशिवाय 968 घटनांमध्ये युवतींसह महिलांना विनयभंगाच्या घटनांना सामोरे जावे लागले आहे. त्यात कोल्हापूर 155, सांगली 158, सातारा 150, सोलापूर ग्रामीण 227 व पुणे ग्रामीण 278 घटनांचा समावेश आहे.
मुडदे पाडण्याची मालिकाच!
राजकीय वैमनस्य, संघटित टोळ्यांतील संघर्ष, अनैतिक संबंध, आर्थिक तसेच जमिनीच्या वादातून भरदिवसा खून करून दहशत माजविण्याच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहेे. 270 दिवसांत परिक्षेत्रात 207 जणांचे मुडदे पडले आहेत. त्यात पुणे आणि सांगली जिल्ह्यांत सर्वाधिक प्रमाण आहे. कोल्हापूर 35, सांगली 51, सातारा 27, सोलापूर ग्रामीण 36 व पुणे ग्रामीण 58 गुन्ह्यांचा समावेश आहे. याशिवाय खुनाचा प्रयत्नाच्या गुन्ह्यात कोल्हापूर 58, सांगली 55, सातारा 60, सोलापूर ग्रामीण 85, पुणे ग्रामीण 105, अशा एकूण358 गुन्ह्यांचा समावेश आहे.