कासारवाडी; उत्तम वडिंगेकर : हातकणंगले तालुक्यातील कासारवाडीसह परिसरात आधीच सुकत चाललेल्या सोयाबीन पिकावर तंबाखूची पाने खाणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव वाढत आहे. अळी पानासह सोयाबीनच्या शेंगा फस्त करत आहेत. यामुळे उत्पादनात घट येऊन शेतकऱ्यांचा खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
हातकणंगले तालुक्यात सुमारे दहा हजार हेक्टरवर सोयाबीन पिकाची लागवड झाली आहे. तब्बल एक महिना उशिरा लागवड झाल्यामुळे व सध्याचे ढगाळ हवामान, पावसाने दिलेली ओढ यामुळे या किडीस पोषक वातावरण तयार झाले आहे. सोयाबीन पिकाची पाने इतकी कुरतडली आहेत की पानांची चाळण झाली आहे. दोन-तीन फवारण्या करूनही कीड आटोक्यात येत नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे. तंबाखूची पाने खाणाऱ्या अळीसह, उंटअळी, चक्रीभुंगा अळीने हल्ला चढविला आहे. यामुळे सोयाबीनचे पीक हातचे जाण्याची भिती निर्माण झाली आहे. पावसाच्या विलंबाने पिकांची वाढ खुंटली आहे. जनावरांच्या चाऱ्यासाठी लावलेल्या मका पिकावरही लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. ढगाळी वातावरणामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. इमामेक्तीन बेन्झाइट १.९ % इसी- १४ मिली फवारण्याची सल्ला टोप कृषी सहाय्यक अमोल कोरे यांनी दिला आहे.
सोयाबीन पिकावर तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीच्या प्रादुर्भाव दिसून येत आहे, प्रति मीटर सोयाबीन ओळीत या किडीची ४ अळया किंवा १०% नुकसानग्रस्त क्षेत्र असल्यास या किडीची आर्थिक नुकसान पातळी ओलांडली आहे.
अभिजीत गडदे, तालुका कृषी अधिकारी, हातकणंगले