जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज, शरद पवार म्हणतात ‘गृहमंत्र्यांची सूचना असावी’

Sharad Pawar On Jalana Violence: मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची धक्कादायक घटना जालन्यात घडली आहे. अंतरावली सराटी इथे ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. आंदोलकांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस होता. त्यावेळी काही कारणास्त्व वातावरण पेटलं अन् पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. त्यानंतर जाळपोळ झाल्याचे व्हिडीओ देखील समोर येत आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गृहमंत्रालयावर गंभीर आरोप केले आहेत.

काय म्हणाले शरद पवार?

पोलिसांना सुचना आल्या तसं त्यांनी केलं असावं. जालन्यातून फोन आले, त्यांनी तेथील परिस्थिती सांगितली. पोलिसांसोबत चर्चा झाली होती. चर्चेनंतर लाठीचार्ज करण्यात आला आहे. बळाचा वापर करण्याची आवश्यकता नव्हती. पोलीस बळाचा वापर झाला, कदाचित गृहमंत्र्यांची सूचना असावी, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. काही घटकांबद्दलची जी भावना आहे, ती पोलिसांच्या कृतीतून व्यक्त होत असते. राज्य सरकार आणि गृहखात्यावर याची जबाबदारी जाते, असं म्हणत शरद पवार यांनी या घटनेचा निषेध केला आहे.

मराठा आक्रोश मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले आहे. अंतरवाली सराटी इथं लाठीचार्ज कोणाच्या आदेशाने झाला, याची चौकशी झालीच पाहिजे, असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. तर काँग्रेसच्या नेत्यांनी देखील सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यामुळे आता येत्या काळात हा मुद्दा आणखीन पेटणार असल्याचं चित्र समोर येत आहे. सरकार यावर कोणता निर्णय घेणार? यावर देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे.

जालन्यात नेमकं काय झालं?

आमरण उपोषण करत असताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर उपोषणस्थळी मनोज जरांगे पाटील यांना घेण्यासाठी पोलीस आले असता मंडपातील नागरिक आणि पोलीसांचा मोठा राडा झाला. बाचाबाची सुरू झाली अन् पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यानंतर आंदोलकांनी जाळपोळ केल्याचं समोर आलं आहे. तर यावेळी पोलीस आणि नागरिक यांच्यात हाणामारी झाल्याची माहिती देखील समोर आलीये.Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *