आंतरवालीतील लाठीचार्जचे पडसाद: निषेध आणि मराठा आरक्षणासाठी आज ठिकठिकाणी आंदोलनांचा इशारा, क्रांती चौकात निदर्शने

छत्रपती संभाजीनगर37 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक
  • देवळाई चौकाजवळ सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी वाहतूक रोखून टायर जाळले

जय जिजाऊ, जय शिवराय… राज्य सरकार मुर्दाबाद… या घोषणांसह आज आमच्यावर लाठ्या उचलल्यात, उद्या तुमच्यावर उचलू, अशा तीव्र भावना शुक्रवारी रात्री ८.३० वाजता सिडको, टीव्ही सेंटर, क्रांती चौकात जमलेल्या सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. जालन्यातील लाठीहल्ल्याचा निषेध करण्यासाठी उत्स्फूर्त जमलेल्या कार्यकर्त्यांच्या घोषणांनी क्रांती चौक दणाणून गेला होता. बीड बायपासवरही छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी टायर जाळून निषेध व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निषेध करण्यात आला.

Related News

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह लाठीचार्जचा आदेश देणारे सरकारी अधिकारी, लाठीचार्ज करणारे पोलिस यांचे राजीनामे घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली. अटकसत्र टाळण्यासाठी शनिवारी सकाळपासून ठिकठिकाणी गनिमी काव्याने रास्ता रोको व निषेध आंदोलने करण्याचा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.

बाहेरगावी जाणाऱ्या बससेस थांबवल्या

मराठवाडा अाणि विदर्भात जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसेस शुक्रवारी रात्री मध्यवर्ती आणि सिडको बसस्थानकात थांबवण्यात अाल्या हाेत्या. परिस्थिती बघून पुढील िनर्णय घेण्यात येईल, अशी माहिती महामंडळाच्या सूत्रांनी दिली. या पार्श्वभूमीवर शहर आणि ग्रामीण दोन्ही पोलिस यंत्रणांनी मोठ्या संख्येने बंदोबस्त तैनात केला आहे.

आंदोलक महिलांवरील लाठीमार अमानुष
आंदोलक आणि महिलांवरील लाठीमार अत्यंत अमानुष अाहे. यास असंवैधानिक राज्य सरकारचे गृहमंत्री जबाबदार आहेत. सरकारने न्याय देण्याची भूमिका घ्यायला हवी होती.

– रेखा वहाटुळे
खबरदारी घेतली
अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस सतर्क आहेत. आम्ही आवश्यक ती खबरदारी घेतली आहे.

– मनीष कलावानिया, पोलिस अधीक्षक

लाठीचार्ज म्हणजे पोलिसांनी घेतलेली सुपारी
आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू असताना विनाकारण लाठीचार्ज केला. हा हल्ला म्हणजे पोलिसांनी घेतलेली सुपारी आहे. याची शिंदे-फडणवीस सरकारला जबर किंमत मोजावी लागेल.

-नितीन देशमुख
तुमच्या सरकारची चाके निखळतील
मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे केलं नाही तर तुमच्या तीनचाकी सरकारची चाके निखळून टाकल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही.

– सुनील कोटकर
अधिकाऱ्यांना तत्काळ बडतर्फ करा
ज्या अधिकाऱ्यांनी लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले व ज्यांनी लाठीचार्ज केला त्या सर्वांना तत्काळ बडतर्फ करावे. राज्य शासनाकडून आरक्षणाची अपेक्षा आहे, लाठ्यांची नाही.

– अभिजित देशमुख
अन्यथा संभाजी ब्रिगेड स्टाइलने धडा शिकवू
फडणवीसांना लाज शिल्लक असेल तर त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अन्यथा संभाजी ब्रिगेड स्टाइलने धडा शिकवेल. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सरकार जबाबदार असेल.

– डॉ. शिवानंद भानुसे

आम्ही आंदोलन शांततेच्या मार्गाने पुढे नेऊ
झाल्या प्रकाराचा आम्ही निषेध करतो. हे आंदोलन शांततेच्या व विधायक मार्गाने पुढे न्यायचे आहे. मराठा आरक्षण कसे देणार हे सरकारने स्पष्ट करावे, अन्यथा उद्रेक होणारच.

– विनोद पाटील, याचिकाकर्ते

शांतता भंग करू नका
या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी योग्य ती दक्षता घेण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक शांतता भंग होणार नाही याची प्रत्येक व्यक्तीने काळजी घ्यावी, असे आवाहन आम्ही करीत आहोत.

– मनोज लोहिया, पोलिस आयुक्त.

गस्तही सुरू राहील
धुळे-सोलापूर रोड, जालना महामार्ग या सर्व ठिकाणी पोलिस फोर्स तैनात आहे. गस्तही सुरू राहील.

– सुनील लांजेवार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक.

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *