पुणे5 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट असा नावलौकिक असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्र – कुलगुरू पदी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची नियुक्ती करून नेमके काय साध्य करायचे आहे ? सदर नियुक्ती ही राजकीय दबावातूनच झाली असून ती तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
वडेट्टीवार म्हणाले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला ऐतिहसिक पार्श्वभूमी आहे. चरित्र जोपासना हे विद्यापीठाचे काम आहे. प्र. कुलगुरुंची (प्रो व्हीसी) निवड हा एक महत्त्वपूर्ण निर्णय असुन जो विद्यापीठाच्या भविष्यकालीन वाटचालीवर आणि विद्यापीठाच्या प्रशासन तसेच शैक्षणिक गुणवत्तेवर लक्षणीय परिणाम करू शकतो. प्र – कुलगुरू पदी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीच्या नियुक्तीने केवळ तात्काळ शैक्षणिक परिदृश्यावर परिणाम होणार नाही तर सावित्रीबाई फुलें पुणे विद्यापीठाच्या भविष्यातील वाटचालीवरही त्याचा परिणाम होणार आहे. पण विद्यापीठात जर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींची नियुक्ती होत असेल तर हे अतिशय गंभीर आहे. यातून नेमके काय साध्य करायचे आहे?
प्र – कुलगुरू भ्रष्टाचार किंवा गैरवर्तनाच्या कोणत्याही आरोपांपासून मुक्त असावे. तसेच त्यांचा रेकॉर्ड निर्दोष असण्याची जोरदार मागणी होत असताना प्र- कुलगुरूंची स्वच्छ प्रतिमा असावी आणि कोणत्याही प्रकारच्या आरोपाखाली त्यांचे नाव नसावे. अशी अपेक्षा विद्यापीठ शिक्षक व शिक्षकेत्तर संघटनेच्या व विद्यापीठ समुदायाच्या एका वर्गाने व्यक्त केली असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्र – कुलगुरू पदी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या डॉ. पराग काळकर यांची नियुक्ती करण्यामागे नेमके कारण काय?
डाँ.पराग काळकर हे विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाचे अधिष्ठाता (डीन) होते. २०१७ ते १८ या कालावधीत त्यांनी आर्थिक गुन्हे केले होते. पिंपरी चिंचवड येथील पोलीस ठाण्यात भादवी ४०६,४०९,४२० असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे त्याच्यांवर दाखल आहेत. असे असताना कुठलीही शहानिशा न करता, ही नियुक्ती कशी झाली? हा गंभीर प्रश्न आहे. अशाच नियुक्त्या करायच्या असतील तर संपूर्ण प्रक्रिया राबविण्याची गरजच काय? राजकीय नियुक्त्या असतील तरी थोडी खातरजमा करून त्या केल्या जाऊ शकतात. पण, अशा नियुक्त्या करून आपण जनतेला काय संदेश देऊ इच्छितो ? हे सरकारने स्पष्ट करावे.