यवतमाळ : महातंत्र वृत्तसेवा : मराठा आरक्षणासाठी आज मंगळवारी नागपूर तुळजापूर मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान पोस्टल ग्राउंड लगतच्या हल्दीराम शोरूममध्ये मोर्चेकऱ्यांकडून तोडफोड करण्यात आली. तसेच, विविध चौकांत टायर जाळून निषेध नोंदवण्यात आला.
यवतमाळ शहरामध्ये बंद पाळण्यात आला. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण होते. यवतमाळमध्ये मराठा आरक्षणासाठी बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. सकाळी आंदोलनकर्त्यांनी व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास सांगितले. आंदोलकांनी, उपमुख्यमंत्र्यांसह शासकीय यंत्रणेचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. यावेळी पोलिसांची प्रचंड तारांबळ उडाली होती. शहरातील नागपूर-तुळजापूर महामार्गावर वनवासी मारोती चौकात चक्काजाम आंदोलन करून टायर जाळण्यात आले. आग विझविण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले होते. या घटनेने शहरात येणारी वाहतूक विस्कळीत झाली. सध्या शहरात तणावपूर्ण वातावरण असून अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यापारपेठ सध्या बंद आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी समाज बांधवांकडून लढा सुरू आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जालना येथील अंतरवाली सराटी येथे मनाेज जरांगे – पाटील यांनी उपाेषण सुरू केले आहे. लाेकशाही मार्गाने हे आंदाेलन सुरू असतानाच पाेलिसांकडून उपाेषणकर्त्यांवर लाठीहल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. राज्यभर मराठा समाजाकडून आंदोलन सुरू असतानाच यवतमाळजिल्ह्यातही मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात येत आहे.
.हेही वाचा
Maratha reservation : जरांगे-पाटील उपाेषणावर ठाम, सरकारला आणखी चार दिवसांची ‘डेडलाईन’
शेतकर्याला पोलिसांनी दिला दिलासा ; चोरीला गेलेला ट्रॅक्टर सहा महिन्यांत शोधला