परळी ,महातंत्र वृत्तसेवा : केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना आहेत, त्या गोरगरीब जनतेच्या हितासाठी अत्यंत लाभदायक आहेत. प्रशासनाच्या बरोबरीने या योजनांचा लाभ गरजूंना मिळावा यासाठी गाव व शहर पातळीवर स्थानिकच्या सर्व पक्षीय नेत्यांनी पुढाकार घेतल्यास खऱ्या गरजूंपर्यंत प्रभावीपणे योजनेचे लाभ पोहोचतील, त्यामुळे योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी राजकीय नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. राज्य सरकारच्या शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकत्रित देण्याचा कार्यक्रम आज कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत परळी वैद्यनाथ येथे आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी श्री. मुंडे बोलत होते.
परळी मतदारसंघासह बीड जिल्ह्यात शासनाच्या विविध घरकुल योजना, स्व.गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना, विविध विषेश सहाय्य योजना, कृषी विभागाच्या योजना आदी सर्वांच्या माध्यमातून लाभ मिळालेल्या व मिळत असलेल्या लाभार्थींची संख्या फार मोठी आहे. या योजनांची प्रभावीपणे अंमलबाजवणी होणे अत्यंत आवश्यक आहे. सर्वांची व्यापक जबाबदारी आहे त्यामुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी देखील पक्षपात किंवा राजकारण यामध्ये येणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, कारण लाभ देणारे प्रामाणिक असल्यावरच योजना यशस्वी ठरतात; असे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.
हेही वाचलंत का?