सायनस विकार कसा ओळखायचा? जाणून घ्‍या सविस्‍तर | महातंत्र

डॉ. संजय गायकवाड

सायनस हा विकार आता इतका सर्वसामान्य झाला आहे की, कुणीही सहजपणे मला सायनसचा त्रास आहे, असं सांगतं आणि आपणही काही विशेष नाही अशा आविर्भावात ते ऐकून घेतो.

सायनस कसा ओळखायचा?

सर्दी झाली की, तिचा पूर्ण वेळ घेऊनच ती बरी होते. जास्तीत जास्त एका आठवड्यात सर्दी बरी होते. अर्थात तिसर्‍या-चौथ्या दिवशी सर्दीची तीव्रता कमी होऊ लागते; पण जर सर्दी एक किंवा दोन दिवसांतच वाहता अचानक थांबली किंवा आपोआप बरी झाली तर सर्दी बाहेर न पडता आतल्या आतच जमा झाली असल्याची शक्यता असते, तिचेच रूपांतर पुढे सायनसमध्ये होते.  सर्दी जवळजवळ एक आठवडा राहिली आणि आपला सगळा वेळ घेऊन बरी झाली तर रुग्णाला सायनस होण्याचा धोका नसतो कारण श्लेष्म वगैरे नाकाच्या माध्यमातूनच बाहेर पडतो. पण, जर वारंवार सर्दी होत असेल आणि ती दोन तीन दिवसांतच बरी होत असेल, नाक वाहत नसेल किंवा औषध घेऊन ती रोखली जात असेल तर तिचे रूपांतर सायनसमध्ये होते.

सायनसचे प्रकार

अ‍ॅक्यूट सायनस : यात सर्दीची लक्षणे अचानक उद्भवतात, म्हणजे नाक जाम होणे किंवा वाहणे आणि चेहर्‍यात वेदना होणे. ही अवस्था आठ दहा दिवसांनंतरही संपत नाही आणि सर्वसाधारणपणे चार आठवड्यांपर्यंत राहते. अ‍ॅक्यूट सायनस हा नेहमी जीवाणूंच्या संसर्गामुळे होतो आणि यात श्वासनलिकेच्या वरच्या भागात संसर्ग होतो. यावर उपचार म्हणून अँटिबायोटिक औषधे दिली जातात. यामुळे सायनस (पोकळ्या)मधील संसर्ग दूर होतो. नाकातील सूज कमी करण्यासाठी नाकात घालण्यासाठी औषध दिले जाते. पण, हे नोजल ड्रॉप्स काही दिवसांपुरतेच घ्यावेत. जास्त दिवस वापरल्याने नाकाच्या आतील पृष्ठभागावर वाईट परिणाम होतो. वेदना कमी होण्यासाठी पेनकिलर औषधे दिली जातात. यात वाफ घेतल्याचाही खूप फायदा होतो. खूप पाणी पिणे आणि आराम करणे हे या आजारावरील प्रभावी उपाय आहेत.

सब अ‍ॅक्यूट सायनस :  सायनसमध्ये चार ते आठ आठवडे सूज आणि आग होत राहते. या आजारावरही अ‍ॅक्यूट सायनसप्रमाणेच उपचार केले जातात.

क्रॉनिक सायनस : यात दीर्घकाळ सायनसमध्ये आग आणि सूज राहते. सायनसची सूज दोन प्रकारांची असते. एक म्हणजे अचानक सूज येते आणि काही दिवसांनी जाते. पण, अनेक रुग्णांमध्ये ही सूज दीर्घकाळ असते आणि त्याबरोबरच नाकात वेदनाही होतात. यात नाकातील मार्ग स्वच्छ करण्याची अत्यंत आवश्यकता असते. जेव्हा सायनसची ही लक्षणे दीर्घकाळ म्हणजे अनेक आठवडे राहतात, तेव्हा त्याला क्रॉनिक सायनस असे म्हणतात. या आजाराचा जीवाला धोका नाही; पण व्यक्ती सतत आजारी असल्यासारखी वाटते. जर कुणाला सायनसची समस्या अनेक वर्षे असेल तर त्याचे रूपांतर अस्थमातही होऊ शकते. लहान मुलांमध्ये हा कालावधी आठ ते दहा वर्षांचा असतो.

रिक्युरंट सायनस : दमा म्हणजे अस्थमा असेल किंवा अ‍ॅलर्जीशी संबंधित एखादा आजार असेल तर वारंवार क्रॉनिक सायनस होऊ शकतो. यावरही जवळ जवळ क्रॉनिक सायनसप्रमाणेच उपचार केले जातात. रुग्णाच्या अवस्थेनुसार डॉक्टर औषधे देतात. सुरुवातीच्या काळात सायनस औषधांनी बरा होऊ शकतो. पण, जर वेळेत उपचार केले नाहीत तर शस्त्रक्रिया हाच शेवटचा उपाय करावा लागतो. सायनसचे उपचार किंवा शस्त्रक्रियेसाठी नाक, कान, घसातज्ज्ञांकडे जावे लागते. सायनससाठी एंडोस्कोपिक सायनस शस्त्रक्रिया केली जाते.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *