आयुष्य छोटे आहे, बिनधास्त जगा; सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा विद्यार्थ्यांना सल्ला | महातंत्र








छत्रपती संभाजीनगर, महातंत्र वृत्तसेवा : आयुष्य छोटे आहे, त्यामुळे बिनधास्त जगा. तुम्ही जे काम करता ते जरुर गांभीर्याने करा. परंतु स्वत:ला गंभीर बनवू नका. कायदा गडद आणि पांढरा असू शकतो, मात्र, तुमचे आयुष्य रंगीत लखलखीत किरणांसारखे असले पाहिजे, असा सल्ला सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी रविवारी कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला. महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या दुसऱ्या पदवीदान समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलपती तथा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायामुर्ती अभय ओक, न्यायामुर्ती दिपांकर दत्ता, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायामुर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय, कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायामुर्ती प्रसन्न वराळे, मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायामुर्ती संजय गंगापूरवाला, रवींद्र घुगे, मंगेश पाटील, कुलगुरु के. व्ही. सरमा, राज्याचे महाधिवक्ता विरेंद्र सराफ आदींची प्रमुख उपस्थिती होती.

सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी आपल्या वीस मिनिटांच्या भाषणात विद्यार्थ्यांना आयुष्य कसे जगावे हे सांगताच कायदा आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या जबाबदाऱ्यांचीही जाणीव करुन दिली. अनेकांना पैशांअभावी, कौटुंबिक परिस्थितीअभावी नामांकित संस्थांमध्ये कायद्याचे शिक्षण घेण्याची संधी मिळत नाही. तुम्हाला ती मिळाली आहे. या संधीबरोबरच तुमच्यावर काही जबाबदाऱ्याही आल्या आहेत. इथे घेतलेल्या ज्ञानाचा वापर करुन तुम्ही मार्गदर्शक बना. तुमच्या पेक्षा वेगळा पोशाख, खाद्य संस्कृती असणाऱ्यांनाही सोबत घेऊन काम करा. आई वडिलांचा आदर करा, हे युग स्पर्धेचे आहे. पण त्यात मुल्यांना धरुन राहणे महवाचे आहे. पण हे करत असताना आयुष्याचा आनंदही घ्या. छोट्या छोट्या गोष्टींतून आनंद मिळवायला शिका. जणू तुमच्याकडे कुणी पाहत नाही अशा पद्धतीने नृत्य करा. कॅलरीज जळण्याचा विचार न करता आईस्क्रिम खा, पोटदुखेपर्यंत हसा, असेही सरन्यायाधीश म्हणाले.

कायदा तोच, आऊटपूट वेगळे

कलम ३०१ असो किंवा कलम १२४ अ हे कायदे इंग्रजकाळातही होते. परंतु त्यावेळी त्यांचा वापर स्वातंत्र्यसैनिकांना तुरुंगात डांबण्यासाठी व्हायचा. आजही हे कायदे आहेत. पूर्वी कायदा वेगळा, आज वेगळा असे नसते. कायदे न्यायासाठीच असतात. परंतु ते कोणाच्या हातात आहेत यावर त्याचे यश अपयश अवलंबून असते. मी जेव्हा कोणाच्या हातात म्हणतो तेव्हा केवळ जज किंवा वकिल एवढेच अभिप्रेत नाही तर समाजही त्यात अंतभूत आहे, असे सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड म्हणाले.

हेही वाचंलत का?









Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *