Luxury shopping mallलक्झरी शॉपिंगचा देशातील सर्वात मोठा मॉल मुंबईमध्ये | महातंत्र

मुंबई, वृत्तसंस्था : देशातील सर्वात मोठा लक्झरी शॉपिंग मॉल रिलायन्स इंडस्ट्रीज उघडणार असून, त्याची सुरुवात एक नोव्हेंबरपासून होणार आहे. ‘जिओ वर्ल्ड प्लाझा’ नावाचा हा मॉल मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये तब्बल 7 लाख 50 हजार चौरस फूट परिसरात असून त्यामुळे आता ब्रँडेड वस्तू खरेदी करण्यासाठी विदेशात जाण्याची गरज उरलेली नाही.

या मॉलमध्ये बुल्गारी, कात्याय, लुई व्हिटॉन, व्हर्साचे, व्हॅलेंटिनो, मनीष मल्होत्रा, अबू जानी, संदीप खोसला, पॉटरी बार्न आणि इतर अनेक महागडे ब्रँडस् उपलब्ध असतील. हे बुल्गारीचे भारतातील पहिले स्टोअर असेल.

ज्या ठिकाणी केवळ आलिशान आणि महागड्या वस्तू मिळतात, असे मोजकेच मॉल सध्या देशात आहेत. यामध्ये डीएलएफ एम्पोरियो, चाणक्य मॉल, यूबी सिटी आणि पॅलेडियम यांचा समावेश आहे.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, भारतात महागड्या वस्तूंकडे पाहण्याचा लोकांचा द़ृष्टिकोन वेगाने बदलत चालल आहे. साहजिकच त्यांची मागणी सातत्याने वाढत आहे. प्रामुख्याने कोरोनानंतरच्या काही वर्षांत त्यांची मागणी लक्षणीय वाढली आहे.

सीबीआरईमधील रिटेल प्रमुख (इंडिया) विमल शर्मा यांच्या मते, भारतातील लोक आता पहिल्यासारखे राहिलेले नाहीत. हे लोक आधी परदेशांत महागड्या वस्तूंच्या खरेदीसाठी तेथील बड्या मॉलमध्ये जात होते. आता ते भारतात महागड्या वस्तू खरेदी करू लागले आहेत. भारत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकल्या जाणार्‍या मालाच्या किमतीतील तफावतही कमी झाली आहे. सध्याच्या घडीला भारतातील श्रीमंत मंडळी ब्रँडेड वस्तूंच्या खरेदीवर सर्वाधिक खर्च करत आहेत. त्यामुळे जिओ वर्ल्ड प्लाझा हे त्यांच्यासाठी आकर्षणाचे मुख्य केंद्र ठरणार आहे.

महागड्या वस्तूंची बाजारपेठ विस्तारणार

स्टॅटिस्टाच्या आकडेवारीनुसार, 2023 मध्ये देशातील महागड्या वस्तूंची बाजारपेठ 7.74 अब्ज डॉलर्सची होती. त्याचा आकार वार्षिक आधारावर 1.38 टक्के दराने वाढण्याचा अंदाज आहे. आकडेवारीनुसार, भारतातील महागड्या वस्तूंमध्ये लक्झरी घड्याळे आणि दागिने यांचा समावेश आहे.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *