मनोज जरांगे बोलायला उभं राहाताना कोसळले, प्रकृती खालावली…’या’ मागण्यांसाठी लढा सुरूच

Manoj Jarange Patril Hunger Strike : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यानी सुरु केलेल्या आमरण उपोषणाचा आज 6 वा दिवस आहे. मनोज जरांगेंची प्रकृती खालावत चाललीय. त्यांना बोलतानाही त्रास होतोय. आज सकाळपासून त्यांची हालचालही मंदावलीय, उठायला आणि बसायलाही त्यांना होत नाहीये. त्यामुळे सकाळपासून जरांगे झोपूनच आहेत. बोलायला उभं राहाताना ते कोसळले. प्रकृती खालावत असली तरीही जरांगे आमरण उपोषणावर (Hunger Strike) ठामच आहेत. तसंच उपचार घेण्यासाठीही त्यांनी नकार दिलाय.

आरोग्यसेविकेचा इशारा
मनोज जरांगे पाटलांवर तातडीने उपचार करा अन्यथा मी आत्महत्या करेन अशा इशारा नांदेडमधील आरोग्य सेविका रेखा पाटलांनी दिलाय.. अंतरवाली सराटीत येऊन जरांगे यांनी उपचार घेण्याची त्यांनी विनंती केली. जरांगे यांची तब्येत पाहून आरोग्य सेविका रेखा पाटील ढसाढसा रडल्या. सरकारने तातडीने आरक्षणाचा निर्णय घ्यावा आणि जरांगे यांचा जीव वाचवावा अन्यथा आम्ही तलवारी घेऊन तुमच्या घरात घुसू असा इशारा त्यांनी दिलाय. 

मराठा समाज आक्रमक
दुसरीकडे मराठा समाज आक्रमक होत चालला आहे. संतप्त मराठा आंदोलकांनी बीडच्या माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरात शिरुन आवारातल्या गाड्या पेटवून दिल्यायत.. माजलगावमधल्या सोळंकेंच्या घराचा गेट तोडून आंदोलकांनी जोरदार दगडफेक केली. दगडफेकीची ही दृष्य झी 24 तासच्या कॅमेऱ्यात कैद झालीयत. संतप्त आंदोलकांनी घरावर दगडफेक करून घोषणाबाजी केली.. तसंच तिथे असलेल्या गाड्याही पेटवून दिल्या. दगडफेकीत सोळंकेंच्या घराच्या काचा फुटल्या असून, तसंच कार जळाल्याने मोठं नुकसान झालंय…

Related News

‘या’ मागण्यांसाठी लढा सुरुच
मराठा आरक्षणासाठी उपोषणाचं हत्यार उपसणाऱ्या मनोज जरांगे पाटलांची तब्येत खालावलीय. मात्र तरीही जरांगे आपल्या निर्धारापासून तसूभरही मागे हटलेले नाहीत. प्रकृती बिघडल्यानंतरही मनोज जरांगे आपल्या निर्धारावर ठाम आहेत. मात्र त्यांनी सरकारसाठी चर्चेचे दरवाजे खुले केलेत. पुढाऱ्यांना गावबंदी आहे. तरीही मला बोलता येतंय, तोपर्यंत चर्चेला या, असं आवाहन जरांगेंनी सरकारला केलंय.. जरांग पाटील यांनी सरकारकडे कोणत्या मागण्या केल्या आहेत. ते पाहूयात.

– मराठा समाजाला सरसकट कुणबी जातप्रमाणपत्र देण्यात यावं, ही मनोज जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी आहे. यासंबंधीची राज्य सरकारने  अधिसूचना काढावी, असंही जरांगे यांनी म्हटलं आहे.

– मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या 45 बांधवांनी सांगितलेला निधी, कुटुंबातल्या एकाला सरकारी नोकरी द्यावी

– महाराष्ट्रातील मराठा समाजाला 50 टक्क्यांच्या आत मराठा म्हणून वेगळा प्रवर्ग करुन आरक्षण दिलं तरीही चालेल पण आम्हाला टिकणारं आरक्षण हवं आहे. मात्र एनटी, व्हीजीएनटीचा प्रवर्ग टिकला तसा टिकला तरच आम्ही ते आरक्षण घेणार, अन्यथा 50 टक्यांच्यावर आरक्षण घेणार नाहीत.

– सरकारने आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची घोषणा केली होती. मराठा समाजावर लाठीमार करणाऱ्या अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. ते आम्हाला मंजूर नाही. त्यांना बडतर्फ केलं पाहिजे ही आमची मागणी आहे. त्यासाठी सरकारने तातडीने पावलं उचलावीत, अशी मागणीही त्यांनी केलीय.

मुख्यमंत्र्यांनी काय अश्वासन दिलं?
दरम्यान,  ज्या मराठा नागरिकांकडे कुणबी असल्याच्या नोंदी सापडल्य़ायत, त्यांना तात्काळ कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही महत्त्वाची घोषणा केलीय. कुणबी दाखल्यांसंदर्भातला शिंदे समितीचा अहवाल उद्या कॅबिनेटसमोर मांडला जाणार आहे. त्यानंतर या प्रक्रियेला सुरुवात होईल. इतर समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणार, अशी पुन्हा ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिलीय. जरांगेंनी सरकारला आणखी थोडा वेळ द्यावा, त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. 



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *