वडीगोद्री; महातंत्र वृत्तसेवा : मराठा आरक्षणासाठी दुसर्या टप्प्यात शांततेत आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचे किती टप्पे आहेत हे आम्हालाच माहीत आहे. शिवाय सगळ्या गावांत आरक्षण मिळेपर्यंत साखळी उपोषण सुरूच राहणार आहे. त्यामुळे आता आरक्षण द्या, नाही तर मराठ्यांशी लढा, हे दोनच पर्याय सरकार समोर आहेत, असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी रविवारी दिला. (Maratha Aarakshan)
मराठा आरक्षणाचे श्रेय कुणी घ्यायचे यावरून मराठा आरक्षण लटकले असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला. दरम्यान, जरांगे यांची प्रकृती खालावत चालली आहे. आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत आरोग्य तपासणी, उपचार किंवा सलाईनही घेण्यास त्यांनी नकार दिला आहे. त्यामुळे कार्यकर्ते चिंतातूर झाले आहेत.
मराठा आरक्षणप्रश्नी रविवारपासून गावागावांत उपोषण सुरू करण्यात आले. यादरम्यान, आंदोलकांनी ठिकठिकाणी नेत्यांच्या गाड्या रोखल्या. बीडमध्ये एसटी बस तर जालन्यात तहसीलदारांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. आंदोलनाचा तिसर्या टप्प्याची घोषणा मंगळवारी करण्यात येणार असल्याचा इशारा जरांगे यांनी दिला आहे.
जरांगे म्हणाले, डॉक्टर म्हणतात माझ्या किडनीवर परिणाम होईल. मला काही झाले तर समाज आंदोलन करेल. मला काही होऊ द्यायचे नसेल तर, आरक्षण द्या. माझे हृदय बंद पडले तर सरकारचेही हृदय बंद पडेल. (Maratha Aarakshan)
घरी आलो तर तुमचा; मेलो तर समाजाचा…
जरांगे यांच्या आई भेटायला आल्याचा उल्लेख करत कुटुंबाला समोर आणू नका, असे आवाहन करून ते म्हणाले, प्रत्येकाचे आपल्या कुटुंबावर प्रेम असते. तसे माझेही आहे. पण एकदा आंदोलन सुरू झाले की, माझे कुटुंब मला भेटायला येत नाही. तुमचा मुलगा समाजासाठी मेला तरी रडू नका, असेही त्यांनी कुटुंबाला बजावले. घरी आलो तर तुमचा, मेलो तर समाजाचा, असा पुनरुच्चार त्यांनी केला.
शंभूराज देसाई यांच्या वक्तव्याचा समाचार
वर्षा बंगल्यावर जरांगेंची बैठक झाली. त्यात त्यांना सर्व सांगितले होते, असे वक्तव्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले होते. याबद्दल जरांगे म्हणाले की, 6 ते 7 महिन्यांपूर्वी आंदोलन केले, तेव्हा त्यांच्याशी चर्चा झाली होती. तेव्हा महसूलचे सचिव नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. तीन महिन्यांत अहवाल देणार होते. या समितीने काहीच केले नाही. 29 ऑगस्टला मुदत संपली. मग हे आंदोलन उभे राहिले. कुठल्या गोष्टी कुठेही जोडू नका. जे खरे आहे ते जनतेला सांगा. त्याचा आणि याचा संबंध जोडू नका, नाहीतर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा जरांगे यांनी शंभूराज देसाई यांना दिला. नारायणगडाचे शिवाजी महाराज नारायणगडकर यांनी मनोज जरांगे- पाटील यांची भेट घेऊन पाणी व उपचार घेण्याची विनंती केली. (Maratha Aarakshan)
हेही वाचा :