Maratha Andolan : पलूस शहरात मराठा समाजाचा एल्गार मोर्चा | महातंत्र

पलूस; महातंत्र वृत्तसेवा : सरकार निवडणुकांना घाबरत असल्याने कोणताही ठोस निर्णय घेत नाही. मराठा समाजाच्या आंदोलनाला चिरडण्याचा विचार करून लोकशाहीच्या विरोधात हे सरकार वागत असल्याची टीका आमदार अरुण लाड यांनी केली. जालन्यातील लाठीचार्जच्या निषेधार्थ पलूस येथे आयोजित विराट सभेत ते बोलत होते.

आमदार अरुण लाड, शरद लाड यांच्या नेतृत्वाखाली एल्गार मोर्चा पलूस शहरातून हजारोंच्या उपस्थितीत काढण्यात आला. या मोर्चाला कुंडलवेस येथून सुरूवात झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सभा झाली. यावेळी आमदार अरुण लाड म्हणाले की, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून योजना आखल्या जातात त्या राबविल्या जात नाहीत. नोकऱ्या देतो म्हणणाऱ्या या सरकारने नोकऱ्या हिसकावून घेतल्या. मराठा समाजाबरोबरच इतर समाजाच्या आरक्षणासाठी सत्तेत गेलेल्या नेत्यांनी धडा घ्यावा आणि आपल्या बांधवांसाठी लढ्यात सामील व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी शरद लाड म्हणाले, लोकशाही असणाऱ्या देशात मराठा आंदोलनाचे म्हणणे ऐकून न घेता ते चिरडण्याचा प्रयत्न केला जातो. हे पुरोगामी महाराष्ट्रात चालणार नाही. आजवर मराठा समाजाने ५८ मोर्चे शांततेने काढले आहेत. आरक्षण हे कायद्याच्या चौकटीतून इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता पाहिजे आणि ते घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. इथून पुढे होणाऱ्या आंदोलकांवर हल्ला झाला तर शांततेने सुरू असलेले आंदोलन उग्र रूप धारण करेल, असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी दिगंबर पाटील, जयप्रकाश साळुंखे, स्वाभिमानी आघाडीचे नेते निलेश येसुगडे, नगरसेवक दिलीप जाधव, आरपीआयचे बोधिसत्व माने, सुरेश शिंगटे, पी. एस. माळी, सतीश पाटील, सर्जेराव खरात, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विनायक गोंदिल, अशोक पवार, जि.प. सदस्य नितीन नवले, अरुण पवार, सरपंच अरविंद मदने, संपत सावंत, डी.एस.देशमुख, महेंद्र करांडे यांचेसह आंदोलक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *