Maratha Lathicharge: ‘मुंबईतून सूचना आली अन्…’, शरद पवारांचा गंभीर आरोप; ‘जखमींच्या शरिरातून छर्रे काढले ‘

जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं असून, जाब मागितला आहे. तसंच जालन्यात जाऊन परिस्थितीचा आढावा घेत जखमींची भेट घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जालन्याचा दौरा करत जखमींची भेट घेतली आहे. या भेटीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. जालन्यात घडलेला प्रकार गंभीर असून, त्याची दखल घेतली नाही तर हा प्रकार जिल्ह्यापुरता मर्यादित राहणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रात हे लोण पसरेल अशी भीती शरद पवारांनी व्यक्त केली. 

“मी मराठवाड्याचा मोठा दौरा आयोजित करण्याच्या प्रयत्नात होतो. कारण यावेळी पाऊस कमी झाला आहे. सर्व जलाशयांची स्थिती चिंताजनक आहे. आता त्यासाठी वेगळा कार्यक्रम घेऊ,” अशी माहिती शरद पवारांनी माहिती दिली. 

“अंबडला हॉस्पिटलला जाऊन आम्ही जखमींची भेट घेतली. आश्चर्य वाटेल अशा प्रकारे त्यांच्यावर बळाचा वापर करण्यात आला आहे. लहान मुलं, बाई, मुली काहीच पाहिलं नाही. हवा तसा बळाचा वापर करण्यात आला. जखमींनी सांगितलं की, चर्चा सुरु होती, अधिकारी आमच्याशी बोलत होते. त्याच्याचून मार्ग निघेल असं दिसत होतं पण एकदम अचानक मोठ्या प्रमाणात पोलीस बोलावण्यात आले. जखमींनुसार, सगळं काही सुरळीत असताना मुंबईतून सूचना आल्यानंतर पोलिसांचा दृष्टीकोन बदलला आणि लाठीचार्ज सुरु केला. लाठीचार्ज सुरु केल्यानंतर गावातील लोकही जमा झाले. यानंतर हवेत गोळीबार करण्यात आला. ज्वारीच्या आकारचे छर्रे वापरत गोळीबारही करण्यात आला. जखमींनी त्यांच्या शरिरातील छर्रे काढण्याची माहिती दिली आहे,” अशी माहिती शरद पवार यांनी दिली. 

Related News

शरद पवारांनी यावेळी आपण कोणाच्याही राजीनाम्याची मागणी करत नाही आहोत असं स्पष्ट केलं. इतका मोठा प्रकार घडला असून, ज्याचे परिणाम सर्व जिल्ह्यात उमटतील असं दिसत आहे तेव्हा ज्यांची जबाबदारी असते, त्यांनी ती घ्यायची असते. आर आर पाटील यांनी मीडियाशी बोलताना चूक झाल्यानंतरही राजीनामा दिला होता. ते एक कर्तबगार गृहमंत्री होते असं सांगत देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाण साधला. 

“जर तुम्ही व्हिडीओ पाहिले तर लोक बसलेले असताना, पाठीमागून डोक्यावर हेल्मेट घातललेल पोलीस मोठ्या संख्येने येतात आणि काही वेळाने सरळ उठून लाठीहल्ला करण्यास सुरुवात करतात. लाठीहल्ला झाल्यानंतर लोक सैरावैरा पळू लागतात. त्यामुळे पोलिसांवर हल्ला झाला असं दिसत नाही. पण पोलिसांकडून हल्ला झाल्याचं दिसत आहे. मी पोलिसांना दोष देणार नाही. त्यांची नोकरी आहे. पण त्यांना आदेश कोणी दिला याची चौकशी झाली पाहिजे. ही चौकशी उच्चस्तरीय नाही, तर न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी शरद पवारांनी केली आहे. 



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *