File Photo
जवळा बाजार महातंत्र वृत्तसेवा : मराठा समाजाला आरक्षण (Maratha reservation) द्यावे तसेच जालना जिल्ह्यात झालेल्या लाठीचार्ज घटनेची चौकशी करून दोषीवर कारवाई करावी या मागणीसाठी जवळाबाजार येथे एका तरुणाने रविवारी दुपारी दुचाकी वाहन पेटविले. यामध्ये दुचाकी वाहन जळून खाक झाले.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ हिंगोली जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामध्ये पहिल्या दिवशी सेनगाव बंद करण्यात आला. त्यानंतर औंढा नागनाथ येथे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना घेराव घालण्यात आला. तसेच वसमत तालुक्यात काळे झेंडे दाखवण्यात आले.
त्यानंतर रविवारी आखाडा बाळापूर व डिग्रस फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान आज दुपारी वसमत तालुक्यातील नहाद येथील विनोद बोरगड या तरुणाने दुपारी तीन वाजता जवळाबाजार येथील मुख्य चौकात येऊन स्वतःचे दुचाकी वाहन पेटवून दिले. जालना जिल्ह्यातील लाठी हल्ल्याच्या घटनेची चौकशी करून दोषीवर कारवाई करावी.मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशा घोषणाही या तरुणाने दिल्या. बघता बघता संपूर्ण दुचाकी जळून खाक झाली. त्यानंतर जवळाबाजार पोलिसांनी विनोद बोरगड या तरुणाला ताब्यात घेऊन त्यानंतर सोडून दिले. सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे, उपनिरीक्षक सतीश तावडे, जमादार भुजंग कोकरे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दुचाकी बाजूला करून रस्ता मोकळा केला.