महातंत्र ऑनलाईन : मराठा आरक्षणाच्या मागणीने जोर धरल्याने राज्यभर हिंसक आंदोलन सुरु आहेत. तसेच मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांचे आठव्या दिवशीही उपोषण सुरु आहे. मराठा आरक्षण प्रश्नी जर आज काही तोडगा न निघाल्यास उद्यापासून पाणीत्याग करण्याचा निर्णय जरांगे- पाटील यांनी घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आज सह्याद्री अतिगृहावर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. (Maratha Reservation)
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही सरकारची तसेच सर्वपक्षीय नेत्यांची भूमिका आहे. कायद्याच्या बैठकीत बसणारे आणि टिकणारे आणि इतर समाजावर अन्याय न होता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. यावर बैठकीत चर्चा झाली. पण यावर थोडा वेळ द्यावा लागेल, असा सूर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
राज्यातील हिंसक आंदोलनाने मराठा समाजाच्या शांततेच्या आंदोलनाला गालबोट लागले. यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर सर्वपक्षीय नेत्यांनी बैठकीत नापंसती व्यक्त केली. तसेच मराठा आरक्षण प्रश्नी सरकार युद्ध पातळीवर काम करत आहे. मराठा समाजाने संयम बाळगावा. सरकारला थोडा वेळ द्यावा. मनोज जरांगे- पाटील यांनी सहकार्य करावे. त्यांनी उपोषण मागे घ्यावे, असा एकमताने ठराव सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
आजच्या सर्वपक्षीय बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, ठाकरे गटातील अंबादास दानवे, शेकापचे जयंत पाटील आणि मंत्रिमंडळातील मिळून ३२ नेते आणि प्रतिनिधी उपस्थित राहिले.