नाशिक : दुष्काळाचे संकट दूर होऊ दे! महादेव अभिषेकावेळी पर्जन्याराजाला रोज विणवणी | महातंत्र

राकेश बोरा

लासलगाव (जि. नाशिक) : महातंत्र वृत्तसेवा

अनियमित पावसामुळे बळीराजा तर हैराण आहेच, परंतु आता सर्वसामान्यांच्या पिण्याच्या पाण्यासोबतच मुक्या जनावरांच्या चारापाण्याचाही प्रश्न निर्माण होणार आहे. दुष्काळाचे संकट दूर होऊ दे! मुबलक पाऊस पडू दे! या मागणीसाठी महादेव मंदिरात श्रावण महिन्यात दरवर्षी शिवभक्त मंडळाकडून होणाऱ्या नित्य अभिषेकप्रसंगी विशेष संकल्पाव्दारे पर्जन्यराजाला विणवणी करण्यात येत आहे.

श्रावण महिन्यात पहाटे अभिषेकाची परंपरा सुमारे १५० वर्षांपेक्षा जास्त जुनी असून परंपरागत संकल्पात यंदा पर्जन्यवृष्टीसाठी विशेष संकल्प रोज करण्यात येत आहे. सकलजनांचे कल्याण व्हावे हा हेतु ठेवुन, पाऊस पडावा, यासाठी पर्जन्ययाग (पावसासाठीचा यज्ञ) करण्याचे नियोजन असुन महादेवाला रोज पहाटे अभिषेक करतांना कळकळची प्रार्थना केली जात आहे.

संतश्रेष्ठ माऊली ज्ञानोबारायांनी देखील आपल्या ज्ञानेश्वरीत जलसंस्कृती संबंधातील, पर्जन्य, पर्जन्ययाग, पर्यावरण, लोकजलसंधारण, सिंचन, दुष्काळ, महापूर, तीर्थक्षेत्रे, गंगामहात्म आदी विषयाचे अत्यंत महत्त्वपूर्ण, विपुल सुरेख वर्णन केले असुन त्यातून जगातील मानवजातीकडेच नव्हे, तर सर्व चराचर सृष्टीकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन त्यांनी स्पष्ट केला आहे.

पाउला पाउला उदकें |

परि वर्षाकाळीही चोखें |

निर्झरे का विशेखें |

सुलभे जेथ ||

पाणीलगे हंसे |

दोनी चारी सारसे |

कवणे एके वेळे बैसे |

तरी कोकिळही हो ||

आज हंस, सारस, कोकिळा हे पक्षी दुर्मिळ झालेच आहेत. शिवाय शकून सांगणाऱ्या काऊने चिऊसह अज्ञात स्थळी दडी मारली आहे. लोकजलसंधारण कसे असावे याबद्दल माऊली ज्ञानोबारायांनी हेच साड़ेसातशे वर्षांपूर्वीच ज्ञानेश्वरीत सांगितले आहे,

नगरेचि रचावीं |

जळाशयें निर्मावीं |

महावने लावावी |

नानाविधें ||

दरवर्षी अभिषेक करणाऱ्या शिवभक्त मंडळातील भक्तांना वाटणारी हि विश्वकल्याणाची तळमळ आपल्याला ज्ञानेश्वरीत प्रत्येक ओवीतून दिसून येते. त्यांच्या भावनांचे स्वरूप हे सकल जनजीवनाचा, प्राणीमात्रांचा विचार करणारे आहे हेच यातून स्पष्ट होते.

हेही वाचा :

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *