अकोला7 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
कंत्राटदाराने कर वसुलीचे काम स्विकारून दहा दिवसाचा कालावधी लोटला आहे. मात्र अद्याप मिटर रिंडीग आणि देयक वाटपाचे काम कंत्राटदाराने सुरु केलेले नाही. केवळ यापूर्वी वाटलेल्या पाणीपट्टी देयकाचा भरणा स्विकारण्याचे काम केले जात आहे.
महापालिकेने मालमत्ता कर वसुली, पाणीपट्टी वसुली, नळांवरील मिटरचे रिडींग, पाणीपट्टी देयक वितरण, बाजार वसुली, मालमत्तांचे पूनर्मुल्यांकनाचे काम सुरु केले आहे. कंत्राटदाराने आपले कर्मचारी नियुक्त केले आहेत. मालमत्ता कर वसुलीचे काम सुरु करण्यात आले असले तरी अद्याप बाजार वसुलीचे काम तुलनेने वेगाने सुरु झालेले नाही. तर दुसरीकडे नळ मिटर रिडींग घेण्याचे काम सुरु करण्याचे अद्याप कंत्राटदाराने सुरु केलेले नाही.
जो पर्यंत मिटर रिडींग घेतले जात नाही आणि ते नळधारकांपर्यंत पोहचवले जात नाही, तो पर्यंत खऱ्या अर्थाने पाणीपट्टी वसुलीचे काम सुरु होणार नाही. त्यामुळे संबंधित कंपनी मिटर रिडींगचे काम केव्हा सुरु करणार? अशी चर्चा या निमित्ताने सुरु आहे. वसुलीचे काम कंत्राटी पद्धतीने दिले असले तरी महसुल मात्र महापालिकेलाच मिळणार आहे. त्यामुळे वसुलीचे काम संथगतीने झाल्यास त्याचा परिणामी प्रशासनाच्या कामकाजावर होणार आहे.
ऑगस्ट महिन्याचे वेतन वेळेवर होणार की नाही?
कर वसुलीचे काम कंत्राटी पद्धतीने देण्याबाबत करारनामा तयार करण्याचे काम सुरु झाल्या पासून मालमत्ता कर वसुली, बाजार वसुली मंदावली होती. तर आता कंत्राटदाराकडे वसुलीचे काम गेल्या नंतरही वसुलीला वेग आलेला नाही. त्यामुळे ऑगस्ट महिन्याचे वेतन एक सप्टेंबरला होईल की या महिन्यात वेतनाला विलंब होईल? अशी चर्चाही या निमित्ताने कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे.