सतीश वैराळकर | छत्रपती संभाजीनगर8 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
शेंद्रा औद्योगिक वसाहतीमधील आॅरिक सिटीमध्ये म्हाडाचा अल्प व मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांसाठी साडेचार हजार घरे बांधण्याचा आराखडा तयार केला आहे. वीज, पाणी, रस्ते आणि ड्रेनेज आदी पायाभूत सुविधा तयार असल्याने कामगार वसाहत वसवण्यात म्हाडाला सोयीस्कर जाईल. प्रस्तावित जागेच्या दरासंबंधीची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत बैठक घेऊन प्रस्ताव मार्गी लावण्यात येईल अशी माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी सोमवारी ‘दिव्य मराठी’ शी बोलताना दिली.
ऑरीक सिटीच्या निर्मितीवेळी नागरी वसाहतीच्या निर्मितीची तरतूद करण्यात आली आहे. घरासंबंधी चर्चा सुरू आहे. पायाभूत सुविधांनी विकसित जमीन असल्याने इतर शासकीय जमिनींच्या तुलनेत दर अधिक असतील.यामुळे आॅरिकसह शेंद्रा औद्योगिक वसाहतीमध्ये छोट्या- मोठ्या उद्योगातील कामगारांच्या हक्काच्या घराचा प्रश्न सुटेल, असे सावे यांनी सांगितले.
७.५० हेक्टर जमीन विकत घेणार
ऑरिकमध्ये नागरी वसाहतींसाठी विकसित जमीन असल्याने म्हाडा संबंधित ७.५० हेक्टर जमीन विकत घेईल. अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील कामगारांसाठी एक सुसज्ज नगर बनवण्यात येईल. शासनाकडे म्हाडाच्या वतीने पत्रव्यवहार केल्याचे छत्रपती संभाजीनगर म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वैद्य यांनी सांगितले.
Information Source / Image Credits