शेंदोळा खुर्द येथील सरपंचांवर अविश्वास: उपसरपंचपदही रिक्त ग्रा.पं. झाली पदाधिकारीविहिन; भावी सरपंच कोण याकडे गावकऱ्यांचे लक्ष

अमरावती5 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

तालुक्यातील शेंदोळा खुर्द येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच अर्चना चिकटे यांच्यावर पदाचा दुरुपयोग आणि ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता कामकाजाचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यामुळे त्यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव पारित झाला असून त्यांना ते पद सोडावे लागले. येथील उपसरपंचपद आधीच रिक्त असल्याने ही ग्रामपंचायत पदाधिकारीविहिन झाली आहे. दरम्यान नवीन सरपंच कोण होते, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

इतरांना विश्वासात न घेता कामकाज करतात म्हणून सरपंच महिलेवर अविश्वास व्यक्त करण्यात आला होता. हा अविश्वास ठराव महसूल यंत्रणेकडे दाखल झाल्यावर त्यांनी विशेष सभा बोलावली. सभेत प्रस्तावाच्या बाजूने ७ तर विरोधात केवळ दोन मते पडली. त्यामुळे अविश्वास ठराव पारित झाला असून त्यांना सरपंच पदावरून पायउतार व्हावे लागले आहे. सभागृहात अविश्वास ठरावाचे बाजूने ग्राप सदस्य दिलीप काळमेघ, रोशन खडसे, प्रमोद ठाकरे, वंदना भोयर, वैशाली समरीत, तृप्ती निस्ताने व रेखा गणेश यांनी मतदान केले तर विरोधात स्वत: सरपंच अर्चना चिकटे व ग्रापं सदस्य आशिष निस्ताने यांनी मतदान केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य आशिष निस्ताने यांनी हात न उंचावता गुप्त पद्धतीने मतदान घेण्याची लेखी मागणी निवडणूक अधिकारी यांच्याकडे केली होती. त्याचवेळी इतर सदस्यांनी हात वर करून निवडणूक घेण्याची मागणी केली होती. शेवटी बहुमताने हातवर करून निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार रवी महाले, नायब तहसीलदार अशोक काळीवकर, ग्रापं. सचिव यु. व्ही. खंडाते, संतोष चौके यांनी सभेचे कामकाज पाहिले.

येथील ग्रामपंचायतीचे सरपंच पद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री साठी राखीव आहे. या प्रवर्गातून अर्चना विलासराव चिकटे या एकमेव महिला विजयी झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना सरपंच पद मिळाले होते. मात्र सदस्यांना विश्वासात न घेता कामकाज करित असल्याने त्यांच्यावर त्यांच्याच गटातील सदस्यांनी अविश्वास दाखल करून तो पारित करण्यात आला आहे. सदर ग्रामपंचायतीमध्ये नामाप्रच्या तीन महिला उमेदवार सर्वसाधारण मतदारसंघातून विजयी झाल्या असून आता आरक्षणाचा प्रवर्ग बदलवून निवडणूक होणार असे मानले जाते. शेंदोळा खुर्द ग्रामपंचायत ही अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष तथा संचालक सुरेशकाका साबळे यांच्या अधिपत्याखालील असून त्यांनी ठरवलेला उमेदवार भावी सरपंचपदी विराजमान होणार हे निश्चित मानले जात आहे.

उपसरपंचपद आधीपासूनच रिक्त

सरपंच पायउतार झाल्यानंतर नव्याने निवडणूक होईपर्यंत सरपंच पदाचा कारभार हा उपसरपंच यांच्याकडे असतो. मात्र येथील उपसरपंच पद आधीपासूनच रिक्त आहे. त्यासाठीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ येथे न्यायप्रविष्ठ आहे.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *