प्रतिनिधी । छत्रपती संभाजीनगर2 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
महापालिका प्रशासनाने रस्त्यावरील वाहन पार्किंगला शिस्त लावण्यासाठी खासगी एजन्सी नेमली आहे. याला जिल्हा व्यापारी महासंघाच्यावतीने कडाडून विरोध करण्यात आला आहे. त्या ऐवजी मनपाने पार्किंगसाठी जागा सुनिश्चित करून हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा, अशी आग्रही मागणी केली आहे.
शहरातील मुख्य रस्त्यावर, बाजारपेठेत मनाला येईल अशा पद्धतीने वाहने उभे केली जातात. यामुळे वाहतूक सेवा ठप्प होते. याचा पर्यटक, व्यावसायिक, ग्राहक आदी सर्वांनाच त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे रस्त्यावरील वाहन पार्किंगला शिस्त लावणे नितांत गरजेचे आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने १ ऑक्टोबर पासून खासगी एजन्सी नेमून त्यांच्यावर बेशिस्त वाहन पार्किंगला शिस्त लावण्याची जबाबदारी सोपावली आहे. या माध्यमातून थातूरमातूर दंडात्मक कारवाई होईल. याचा सर्वाधिक फटका ग्राहकांना बसेल. याचा व्यापारावर थेट परिणाम होईल. त्यामुळे जिल्हा व्यापारी महासंघाने याला कडाडून विरोध केला आहे. तसेच काही उपाययोजनाही सुचवल्या आहेत.
पहिले मुलभूत सुधारणा करा
वाहन पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यापूर्वी महापालिका प्रशासनाने पहिले मुलभूत सुधारणा कराव्यात. यामध्ये जसे की रस्त्याच्या दोन्ही बाजूला पांढरे पट्टे मारणे, बाजारपेठेंच्या आजूबाजूला पार्किंगची व्यवस्था करून देणे ज्यामुळे व्यापाऱ्यांना व नागरिकांना त्रास होणार नाही. या सुधारणा न करताच कारवाई केल्यास भांडणे व ताण तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, याकरिता प्रशासनाने व्यापारी तसेच नागरिकांबरोबर चर्चा करून ही मोहीम चांगल्या प्रकारे राबवली जाईल याविषयी माहिती घेऊन पार्किंगचे सुनियोजित धोरण ठरवावे, यासाठी जिल्हा व्यापारी महासंघ त्यांना मदत करेल, अशी ग्वाही दिली आहे.
निवेदन देणार
जिल्हा व्यापारी महासंघाचे शिष्टमंडळ सुनियोजित वाहन पार्किंग धोरण निश्चित करण्यासाठी महापालिका प्रशासन, पोलिस प्रशासन व लोकप्रतिनिधींची भेट घेऊन त्यांच्याकडे याबाबत निवेदन सादर करणार असल्याचेही त्यांनी कळवले आहे.