मणिपूरमध्ये मोदी सरकारकडून भारत मातेची हत्या, राहुल गांधींचा घणाघात; लोकसभेत गदारोळ

Rahul Gandhi in Lok Sabha : विरोधकांनी मोदी सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. आज दुसऱ्या दिवशीही अविश्वास ठरावावरील चर्चेला सुरुवात झाली. अशातच या चर्चेदरम्यान राहुल गांधी कधी बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर आज सभागृहात राहुल गांधींनी अविश्‍वास प्रस्तावावर लोकसभेत  भाषण केलं. राहुल गांधी अविश्वास ठरावावर बोलत आहेत. राहुल यांनी मणिपूरच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान मणिपूरला गेले नाहीत. कारण तुमच्यासाठी मणिपूर भारतात नाही. मणिपूरमध्ये भारताची हत्या झाली. तुम्ही मणिपूरचे दोन भाग केलंय, तोडलंय, असं म्हणत राहुल गांधींनी मोदींवर थेट हल्लाबोल केला आहे. 

राहुल गांधींनी भाषणाच्या सुरुवातीला आपल्याला लोकसभेत घेतलं याबाबत लोकसभा अध्यक्षांचे आभार मानले. अन् पहिला वार थेट भाजपवर केला. राहुल गांधी म्हणाले की, “मागील वेळी मी जेव्हा अदानी यांच्यावर बोललो तेव्हा काहींना त्रास झाला. यावेळी मी हृदयापासून, मनापासून बोलणार आहे.”

Related News

मणिपूरमध्ये मोदी सरकारनं भारताची हत्या केली : राहुल गांधी

राहुल गांधी म्हणाले की, काही दिवसांपूर्वी मणिपूरला गेलो होतो. पण आमचे पंतप्रधान गेले नाहीत. कारण मणिपूर त्यांच्यासाठी भारत नाही. मणिपूरचे सत्य हेच आहे की, मणिपूर आता उरलेलंच नाही. तुम्ही मणिपूरचे दोन भाग केले आहेत. तुटलं आहे मणिपूर. मी रिलीफ कॅम्पमध्ये गेलो आहे, तिथल्या महिलांशी बोललो. एका महिलेला विचारलं की, तुमच्यासोबत काय झालं? ती म्हणाली, माझा लहान मुलगा, एकुलता एक मुलगा होता. त्याला माझ्या डोळ्यांसमोर गोळ्या घालण्यात आल्या. मी रात्रभर त्याच्या मृतदेहासोबत पडून राहिले. मग मी घाबरले, मी माझं घर सोडलं. मी विचारलं की, घर सोडताना काहीतरी आणलं असेल. ती म्हणाली की, माझ्याकडे फक्त माझे कपडे आहेत आणि तिच्याजवळचा एक फोटो दाखवत म्हणाली, माझ्याकडे फक्त हीच गोष्ट उरली आहे. 

राहुल गांधी म्हणाले की, दुसऱ्या एका रिलीफ कॅम्पमध्ये एक महिला माझ्याकडे आली, मी तिला विचारलं, तुझ्यासोबत काय झालं? मी तिला हा प्रश्न विचारताच क्षणार्धात ती थरथरू लागली. तिच्या मनात त्या विदारक आठवणी जाग्या झाल्या आणि ती बेशुद्ध झाली. माझ्यासमोर ती महिला बेशुद्धा झाली. ही दोनच उदाहरणं मी सांगितली आहेत. त्यांनी मणिपूरमध्ये भारताची हत्या केली आहे. त्यांनी मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या केली आहे. मणिपूरमध्ये हिंदुस्थानची हत्या झाली आहे.

राहुल यांच्या या वक्तव्यावर सत्ताधारी पक्षानं गदारोळ केला. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, मणिपूरमध्ये सात दशकात जे काही घडलं त्याला काँग्रेस जबाबदार आहे. राहुल गांधी यांनी तात्काळ माफी मागितली पाहिजे.

दरम्यान, काँग्रेसकडून राहुल यांच्याशिवाय रेवंत रेड्डी आणि हेबी एडन यांची नावे चर्चेसाठी देण्यात आली आहेत. त्याचवेळी विरोधकांच्या आरोपांवर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या अविश्वास प्रस्तावावर सरकारची बाजू मांडणार आहेत. यानंतर गृहमंत्री अमित शहा, निर्मला सीतारामन, हिना गावित, रमेश बिधुरी विरोधकांच्या आरोपांना उत्तर देतील. राहुल मंगळवारी काँग्रेसच्या वतीनं चर्चेला सुरुवात करणार होते, तरीही काँग्रेसनं शेवटच्या क्षणी आपली रणनीती बदलून गौरव गोगोई यांनी चर्चेला सुरुवात केली.

काय म्हणाले राहुल गांधी? 

सभापती महोदय, मला तुमची माफी मागायची आहे. मागच्या वेळी अदानीच्या मुद्द्यावर मी बोललो होतो. त्यामुळे ज्येष्ठ नेते त्रस्त झाले. पण तुम्हाला आता घाबरण्याची गरज नाही. आज माझ्या भाषणात मी अदानींवर बोलणार नाही. तुम्ही निश्चिंत राहा.  शांत राहू शकता. माझं आजचं भाषण दुसऱ्या दिशेनं जात आहे. रुमी म्हणाले होते, “जो शब्द दिल से आते हैं, वो शब्द दिल में जाते हैं”. त्यामुळे आज मला माझ्या मेंदूतून नाही तर हृदयापासून बोलायचं आहे आणि मी तुमच्यावर अजिबात टीका करणार नाही. मी एक किंवा दोन निशाणे नक्कीच साधेल, परंतु मी इतकी टीकास्त्र डागणार नाही. तुम्ही लोक आराम करू शकता.

भारत एक आवाज : राहुल गांधी

राहुल गांधी म्हणाले की, यात्रेदरम्यान एका शेतकऱ्यानं कापसाचा गठ्ठा दिला. तो शेतकरी म्हणाला, राहुलजी माझ्याकडे हेच राहिलं आहे. बाकी काही राहिलेलं नाही. राहुल गांधी म्हणाले की, मी शेतकऱ्याला विचारलं की, विम्याचे पैसे मिळाले का? तो म्हणाला नाही… भारतातील बड्या उद्योगपतींनी ते हिसकावून घेतले. राहुल गांधी म्हणाले, मी एक विचित्र गोष्ट पाहिली. त्याच्या हृदयातील वेदना मला जाणवल्या. त्याच्या वेदना माझ्या वेदना झाल्या.

राहुल गांधी म्हणाले, लोक म्हणतात हा देश आहे, काही म्हणतात या वेगवेगळ्या भाषा आहेत. काही म्हणतात की धर्म आहे. हे सोनं आहे. हे चांदी आहे. पण सत्य हेच आहे की, हा देश फक्त एक आवाज आहे. वेदना आहे, दु:ख आहे. अडचण आहे. हा आवाज ऐकायचा असेल तर आपला अहंकार, आपली स्वप्नं बाजूला ठेवावी लागतील. तरच तो आवाज ऐकू येईल.

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *