शेवगाव तालुका : महातंत्र वृत्तसेवा : वीजबिल अदा केल्याने शेवगाव-पाथर्डी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना पूर्ववत सुरू झाली आहे. काही अंशी थकबाकी भरलेल्या गावांनाच योजनेचे पाणी दिले जाणार असून, पाण्यासाठी काही लाभार्थी गावांत थकीत पाणीपट्टीची पठाणी वसुली सुरू झाली आहे. वीजबिल थकल्याने शेवगाव पाथर्डी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. मात्र, शेवगाव नगरपरिषदेने 15 लाख, तर पाथर्डी नगरपरिषदेने 10 लाख रूपयांची पाणीपट्टी अदा केली. 2 कोटी 50 लाख बिलापैकी सदरची 25 लाख रूपये रक्कम वीज बिलापोटी भरल्याने गुरूवारी सायंकाळी योजनेचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. मात्र, शेवगाव, पाथर्डी शहर, तसेच आव्हाणे, मंगरुळ व थकबाकी नसलेल्या गावांनाच पाणीपुरवठा केला जाणार आहे.
दोन्ही तालुक्यातील काही लाभार्थी गावांकडे जवळपास 5 कोटी रूपयांची पाणीपट्टी थकीत आहे. यामध्ये पाथर्डी तालुक्यातील सुसरा, डांगेवाडी, हत्राळ, निवडुंगे, वाळूंज, आगसखांड, दुलेचांदगाव, पागोरी पिंपळगाव, चितळी, खेर्डे, माळी बाभुळगाव, सांगवी, माळेगाव, साकेगाव, तर शेवगाव तालुक्यातील अमरापूर, वरूर, तळणी, घोटण, नजिक बाभुळगाव, करूडगाव, भगूर, गदेवाडी, खुंटेफळ, वडुले बु., सामनगाव, लोळेगाव, सालवडगाव, माळेगाव-ने, ठाकूर निमगाव, हसनापूर, कोळगाव, मंगरूळ बु., मंगरुळ खु., सुलतानपूर, आव्हाणे खु., आव्हाणे बु., बर्हाणपूर, वाडगाव, आखेगाव, खरडगाव या गावांचा थकीत पाणीपट्टीत समावेश आहे.
सध्या तालुका दुष्काळात होरपळत आहे. पिकांअभावी शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला असून, निसर्गाबरोबर शासनानेही त्यास वेठीस धरले आहे. योजनेचे पाणी मिळत नसल्याने नागरिक पाण्यासाठी भटकत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. हा सारासार विचार करता प्रशासनाने लाभार्थी गावाचा पाणीपुरवठा बंद करू नये, अशा सूचना देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
प्रशासकांकडूनही पाणीपट्टी वसुली नाही
आव्हाणे, मंगरूळ ग्रामपंचायतीने काही रक्कम अदा केल्याने तेथील पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. दोन्ही तालुक्यातील काही गावांत ग्रामपंचायत निवडणुका सुरू आहेत. त्यांची मुदत संपल्याने पूर्वीच या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त झाले आहेत. मात्र, त्यांनीही पाणीपट्टी वसुली केली नसल्याचे दिसते.
हेही वाचा