नागपूर; महातंत्र वृत्तसेवा : बंगरूळु ते दिल्ली विस्तारा एअरलाईन्सच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करीत नागपुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या चिमुकलीचा जीवन संघर्ष अखेर आज संपला. एम्सच्या ज्या पाच डॉक्टरांनी खूप प्रयत्नांनी तिला नागपूरपर्यंत आणले त्यांच्याशी सारेच हळहळले. उपचारासाठी आल्यानंतर हवाई प्रवास करत असताना २७ ऑगगस्टला रात्री १०.३० च्या सुमारास एका अवघ्या १५ महिन्याच्या चिमुकलीला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यावेळी विमान नागपूर विमानतळावर उतरविण्यात आले. त्या चिमुकलीवर नागपुरातील किम्स-किंग्सवे रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आज गुरुवारी पहाटे ३.१५ वाजता तिची प्राणज्योत मावळली. प्रवासादरम्यानच तिची प्रकृती गंभीर झाली होती. दरम्यान विमानात प्रवास करणाऱ्या दिल्ली एम्सच्या डॉ. नवदीप कौर, डॉ. ओशिखा, डॉ. अविचला तक्षक, डॉ. दमणदीप सिंग, डॉ. रिषभ जैन या पाच डॉक्टरांनी तिच्यावर विमानातच तब्बल ४५ मिनिटे उपचार केले. त्यावेळी पुन्हा तिचा श्वास सुरू झाला . पुढील उपचारासाठी विमान आपत्कालीन परिस्थितीत नागपूर विमानतळावर उतरविल्यानंतर तिला तातडीने किम्स-किंग्सवे रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले. उपचारादरम्यान तिचे मूत्रपिंड निकामी झाले होते आणि तिला अनेक विकारांनीही ग्रासले होते. या चिमुकलीला जन्मजात हृदयविकाराचा त्रास होता. किम्स-किंग्जवे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी तिचे प्राण वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र अखेर आज तिचा जीवन-मृत्यूचा संघर्ष संपला.