हिंगोली8 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
कळमनुरी तालुक्यातील वारंगाफाटा शिवारात चरस विक्रीसाठी आलेल्या राजस्थानातील तिघांना नांदेच्या दहशतवाद विरोधी पथक व आखाडा बाळापूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करून रविवारी (ता. २७) सायंकाळी पाच वाजता पकडले आहे. त्यांच्याकडून ३ लाख ८० हजार रुपये किमतीचा १.८० किलो चरस जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानातील भिलवाडा येथील तिघे जण वारंगाफाटा शिवारात चरस विक्री करण्यासाठी आल्याची माहिती नांदेडच्या दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानंतर या पथकाने तातडीने आखाडा बाळापूर पोलिसांशी संपर्क साधला. दहशतवाद विरोधी पथकाचे अधिकारी तसेच आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार, जमादार रोहिदास राठोड, प्रभाकर भोंग यांच्या पथकाने सायंकाळी पाच वाजता सापळा रचला होता.
यावेळी पोलिसांनी वारंगा शिवारात मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या तीन संशयीतांची चौकशी सुरु केली. मात्र पोलिस आल्याचे लक्षात येताच तिघेही घाबरून गेले. त्यामुळे पोलिसांनी त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे १.८० किलो चरस असल्याचे दिसून आले. या चरसची किंमत ३.८० लाख रुपये आहे.
दरम्यान, पोलिसांनी चरस जप्त करून महावीर छोटूलाल सारण (रा.कटवाडा, जि. भीलवाडा राजस्थान), देवबक्ष ब्रह्मालाल बघाला, रामकिशन भैरूलाल भारजोलिया (रा. बलकाखेड जिल्हा भीलवाडा) यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेडच्या पथकाकडून त्यांची चौकशी सुरु आहे. यापुर्वी कोणाला चरस विक्री केला. यासह यामध्ये इतर कोण सहभागी आहे याची माहिती घेण्याचे काम सुरु असल्याचे सुत्रांनी सांगितले.