Nashik Drug Case : ललितच्या दोघा सहकार्‍यांना अटक; जमिनीत पुरलेले २५ कोटींचे ड्रग्ज नाशकातून हस्तगत | महातंत्र








मुंबई; महातंत्र वृत्तसेवा : ड्रग्ज तस्करीतील मुख्य आरोपी ललित अनिल पाटीलच्या दोघा सहकार्‍यांना साकिनाका पोलिसांनी अटक केली. आमीर आतिक खान आणि हरिश्चंद्र पंत अशी या दोघांची नावे आहेत. त्यांच्या अटकेने या गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपींची संख्या आता 18 झाली आहे. दरम्यान, ललितचा चालक सचिन वाघ याने नाशिकच्या गावी जमिनीत पुरून ठेवलेला साडेबारा किलो एमडी ड्रग्जचा साठा पोलिसांनी जप्त केला. त्याची किंमत सुमारे 25 कोटी रुपये आहे.

या कारवाईत आतापर्यंत साकीनाका पोलिसांनी 163 किलो 882 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्जसह एक गावठी कट्टा, सात जिवंत काडतुसे, चार लाखांची रोकड असा 325 कोटी 26 लाख 10 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. ललितच्या अटकेनंतर त्याचा कारचालक सचिन वाघ याला पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलिस कोठडीत आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे. या चौकशीदरम्यान या टोळीतील दोन वाँटेड असलेल्या आमीर खान आणि हरिश्चंद्र पंत या दोघांना गुरुवारी पोलिसांनी अटक केली. सचिनच्या चौकशीतून त्याने नाशिक येथील कारखान्यातून बनविण्यात आलेला एमडी ड्रग्जचा साठा त्याच्या देवळा, सटवाईवाडीतील गावी जमिनीत पुरून ठेवल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर या पथकाने जमिनीत पुरून ठेवलेला 12 किलो 577 एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींची नावे समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती
घेतली आहे.

सोलापूर कारखान्याच्या मुख्य सूत्रधाराला हैदराबादेतून अटक

सोलापूर येथील एमडी ड्रग्ज कारखान्यांचा पर्दाफाश करून दोन आरोपींच्या अटकेनंतर त्यांच्या अन्य एका वाँटेड आरोपीस वांद्रे युनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. कैलास सिंहाजी वनमाळी असे या आरोपीचे नाव आहे.









Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *