अमरावती6 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
केवळ गणेशोत्सवच नव्हे तर वर्षभर वेगवेगळ्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून येथील आझाद हिंद मंडळाने अमरावतीकरांच्या हृदयात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. सध्या हे मंडळ शताब्दी वर्षाकडे वाटचाल करीत असून २०२८ साली हा क्षण येणार आहे. ‘आझाद’ने वेळोवेळी सामाजिक भान जपले. त्यामुळे या मंडळाची ख्याती ही केवळ मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचीच नव्हे तर अख्ख्या अमरावतीकरांची शान बनली आहे.
बाप्पाचे आगमन हे आझाद हिंद मंडळाचे उर्जास्रोत आहे. या पर्वाला मंडळाचे सर्व जुने-नवे पदाधिकारी, मित्रमंडळ, परदेशस्थ आप्त सर्वजण एकत्र येतात. अशाप्रकारे दहा दिवसांतील विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून एक नवा अध्याय समाजापुढे मांडला जातो. थोडक्यात आझाद हिंद मंडळाचा गणेशोत्सव हा खरोखरच इतरांसाठी प्रेरणादायी व आदर्शवत ठरला आहे. परकीय शत्रूंशी लढताना ज्यांना सीमेवर वीरमरण आले, त्यांच्या पुत्रांना शैक्षणिक सहाय्य, त्यांच्या मातांचा यथोचित सन्मान, वीररस राष्ट्रीय कवि सम्मेलनाचे आयोजन, मराठीचा झेंडा सतत उंचावत रहावा म्हणून दादा कोंडके, निळू फुले, मधू कांबीकर यांच्यासारख्या दिग्गजांच्या उपस्थितीत भरवलेल्या परिषदा, राज्य नाट्य स्पर्धेत योगदान, सोमेश्वर पुसतकर स्मृती रक्तदान शिबीर, हरिभाऊ कलोती स्मृती शरीर सौष्ठव स्पर्धा, बाळासाहेब दिघेकर व सुभाष पुसतकर स्मृती कबड्डी स्पर्धा, नानासाहेब बामनगावकर यांच्या स्मृत्यर्थ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असे अनेक सामाजिक कार्यक्रम या मंडळाने स्वत:च्या नावावर कोरले आहेत.
राजकीय अथवा सामाजिक क्षेत्रातील ताज्या घडामोडींवर चर्चा घडवून संबंधित यंत्रणेला दिशादर्शन करणारी वादविवाद स्पर्धा हे या मंडळाच्या गणेशोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य. या स्पर्धेंतर्गत आतापर्यंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विदर्भाची मुलूखमैदानी तोफ भाऊ जांबुवंतराव धोटे, अनेक माजी खासदार-आमदार या मंचावर येऊन गेलेत. हा अजरामर कार्यक्रम पुन्हा एकदा सुरु करण्यासाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी हालचाली सुरु केल्या आहेत.
हे आहेत मंडळाचे कर्तेधर्ते
अध्यक्ष – पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, कार्याध्यक्ष – माजी महापौर विलास इंगोले, सचिव – दिलीप कलोती, उपाध्यक्ष – माजी खासदार अनंत गुढे व किशोर फुले, कोषाध्यक्ष – दिलीप दाभाडे, गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष – विजय भुतडा, कार्याध्यक्ष – अॅड. ब्रजेश तिवारी, स्वागताध्यक्ष – सुभाष पावडे, सचिव – संतोष चिखलकर, कोषाध्यक्ष – निलेश वानखडे.