OBC Reservation : चंद्रपूरात टोंगे यांच्या ओबीसी आंदोलनाला आमदार प्रतिभा धानोरकर यांचा पाठिंबा | महातंत्र

चंद्रपूर; महातंत्र वृत्तसेवा : चंद्रपूर येथे ओबीसी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र टोंगे यांनी 11 सप्टेंबरपासून उपोषणाला सुरुवात केली आहे. ओबीसींची जनगणना करणे, कुणबी आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण न देणे यासारख्या प्रमुख मागण्यांसाठी ते आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाच्या उपोषण मंडपाला आज शनिवारी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. तसेच  “कोणत्याही प्रकारची घाई न करता ओबीसी संघटनांशी चर्चा करून निर्णय घ्यावा आणि संविधानिक ओबीसी प्रवर्गाची बिहार राज्याप्रमाणे जातनिहाय जनगणना करावी. विद्यार्थी वसतीगृह तत्काळ सुरू करावे. मागासवर्गीय आयोगाला निधी व इतर बाबी उपलब्ध करून द्यावी अशी अपेक्षा आमदार प्रतिभा धानोरकर यांनी, व्यक्त केली.

या प्रसंगी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर, शहर काँग्रेस जिल्हाध्य्क्ष रामू तिवारी, ओबीसी अध्यक्ष राहुल चौधरी, डॉ. शरयू बबन तायवाडे, राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ अध्यक्ष इंजि. सुषमा भंड, साधना बोरकर, वृंदा विकास ठाकरे, नंदा उदयराव देशमुख, मनीषा बोबडे, श्रीधरराव मालेकर, प्रभाकर दिवसे, अरविंद मुसळे यांची उपस्थिती होती.

आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी आंदोलनस्थळी जाऊन टोंगे यांची भेट घेतली आणि त्यांच्या मागण्यांची माहिती घेतली. त्यांनी सांगितले की, ओबीसींच्या अनेक वर्षांपासून अनेक मागण्या प्रलंबित आहेत. ओबीसींची जनगणना करणे ही सर्वात महत्वाची मागणी आहे. मात्र, अजूनही ओबीसींची जनगणना झाली नाही. यामुळे ओबीसींना त्यांच्या हक्कांपासून वंचित राहावे लागत आहे.

आमदार धानोरकर यांनी सांगितले की, मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी आमचा विरोध नाही. मात्र, कुणबी आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण देणे हे योग्य नाही. यामुळे ओबीसींचे आरक्षण कमी होईल. त्यामुळे मराठ्यांना स्वतंत्र रक्षण देण्यात यावे, अशी मागणी करीत टोंगे यांच्या आंदोलनाला पाठींबा दिला.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *