हिंगोली, महातंत्र वृत्तसेवा : येथील वनविभागाच्या एका कर्मचाऱ्याची वैद्यकीय रजा अर्जित रजेमध्ये परावर्तित करण्यासाठी पंधरा हजार रुपयाची लाच घेणाऱ्या कार्यालयीन अधीक्षकाला रंगेहात पकडले. अरुण पवार असे कार्यालयीन अधीक्षकाचे नाव आहे. ही कारवाई आज (दि.८) दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, हिंगोलीच्या वन विभागामध्ये कार्यरत असलेले एक कर्मचारी अपघातामुळे वैद्यकीय रजेवर गेले होते. सदरील वैद्यकीय रजा अर्जित रजेमध्ये परावर्तित करण्याची विनंती त्यांनी केली होती. त्यानुसार कार्यालयीन अधीक्षक अरुण पवार यांनी त्या कर्मचाऱ्याला 22 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यापैकी पंधरा हजार रुपये देण्याचे ठरले होते. या प्रकरणात संबंधित कर्मचाऱ्याने हिंगोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
यावरून उपाधीक्षक अनिल कटके, पोलीस निरीक्षक प्रफुल्ल अंकुशकर, विनायक जाधव, जमादार तानाजी मुंडे, भगवान मंडलिक, गजानन पवार, राजेंद्र वरणे, राजाराम फुपाटे, ज्ञानेश्वर पंचलिंगे, शिवाजी वाघ, शेख अकबर यांच्या पथकाने वनविभागाच्या परिसरामध्ये सापळा रचला. दरम्यान ठरल्याप्रमाणे आज दुपारी एक वाजता तक्रारदाराकडून 15 हजार रुपयाची लाच घेताना अरुण पवार यास रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून त्याच्या घराची झडती घेतली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
हेही वाचा