Pak vs SA : पाकिस्तानच्या पराभवाचा ‘चौकार’! द. आफ्रिकेचा पाचवा विजय | महातंत्र

महातंत्र ऑनलाईन डेस्क : एकदिवसीय विश्वचषकाच्या 26व्या सामन्यात द. आफ्रिकेने पाकिस्तानवर एक विकेट राखून विजय मिळवला. पाकचा हा सलग चौथा पराभव ठरला आहे. पाकच्या 270 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना द. आफ्रिकेने 47.2 षटकांत 271 धावा केल्या.

द. आफ्रिकेची चांगली सुरुवात

271 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या द. आफ्रिकेच्या संघाची सुरुवात चांगली झाली. संघाने केवळ 2 षटकांत 30 धावा केल्या. पाकिस्तानकडून इफ्तिखार अहमदने पहिले षटक नव्या चेंडूने टाकले. त्यानंतर डावाच्या दुस-या षटकात डी कॉकने शाहीनची गोलंदाजी फोडून काढली आणि सलग 4 चौकार मारत 19 धावा वसूल केल्या. चौथ्या षटकात द. आफ्रिकेलाही पहिला धक्का बसला. क्विंटन डी कॉक 24 धावा करून शाहीन आफ्रिदीचा बळी ठरला. त्याच्यानंतर टेम्बा बावुमा आणि रॅसी व्हॅन डर डुसेन यांनी डावाची धुरा सांभाळली. पण बावुमाही 10व्या षटकात झेलबाद झाला. त्याला मोहम्मद वसीमने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. द. आफ्रिकेने 67 धावांत 10 षटकात 2 विकेट गमावल्या.

डुसेन-मार्करामने सावरले

द. आफ्रिकेने पहिल्या 10 षटकांत दोन्ही सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या. इथून एडन मार्कराम आणि डुसेन यांनी डाव पुढे नेला. दोघांनी 54 चेंडूत 54 धावांची भागीदारी केली आणि संघाची धावसंख्या 100 धावांच्या पुढे नेली. डुसेन 21 धावा करून बाद झाला. त्यानंतर हेन्रिक क्लासेन फारसे काही करू शकला नाही. तो 12 धावा करून बाद झाला. द. त्यामुळे आफ्रिकेची धावसंख्या 4 गडी बाद 136 अशी झाली.

मिलर-मार्करामने स्कोअर 200 च्या पुढे नेला

136 धावांवर 4 विकेट गमावल्यानंतर मार्करामने डेव्हिड मिलरच्या साथीने जबाबदारीने खेळ केला. मार्करामने अर्धशतक पूर्ण केले, तर दुसरीकडे मिलरने उसामा मीरवर हल्ला केला. ही जोडी फोडायला आफ्रिदीला यश आले. त्याने मिलरला झेलबाद केले तेव्हा दोन्ही खेळाडूंनी 70 धावांची भागीदारी केली होती. मिलर 29 धावा करून बाद झाला.

मार्कराम नर्वस 90 चा बळी

मिलरच्या विकेटनंतर मार्करामने मार्को जॅन्सनसह डावाची धुरा सांभाळली. त्याने यान्सन (20) आणि जेराल्ड कोएत्झेसह छोट्या पण उपयुक्त भागिदारी रचल्या. पण मार्कराम 91 धावा करून उसामा मीरच्या गोलंदाजीवर बाबरकडे झेल देऊन तंबूत परतला. त्याच्यापाठोपाठ गेराल्ड कोएत्झे 10 धावा काढून माघारी परतला. त्यामुळे द. आफ्रिकेने 250 धावांवर 8 विकेट गमावल्या.

पाकने टॉस जिंकला

तत्पूर्वी, टॉस जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तानी संघाला अवघ्या 20 धावांवर पहिला धक्का बसला. डावाच्या 5व्या षटकात अब्दुल्ला शफीक 17 चेंडूत 9 धावा काढून बाद झाला. इमाम उल हकनेही निराशा केली आणि तो अवघ्या 12 धावा करून माघारी परतला. मार्को जेन्सनने पाकच्या या दोन्ही सलामीवीरांची शिकार केली. यानंतर कर्णधार बाबर आझमने मोहम्मद रिझवानच्या सोबतीने पाक संघाचा डाव सावरला. मात्र रिझवान 31 धावा करून तंबूत परतला. या विकेटनंतर इफ्तिखारने काहीवेळ द. आफ्रिकेच्या मा-याचा प्रतिकार केला. पण तोही 21 धावा करून बाद झाला. एका बाजूला बाबर संयमी खेळी करत होता. त्याने 64 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. पण त्याला मोठी खेळी करता आली नाही आणि तो 50 धावा करून तबरेज शम्सीचा बळी ठरला. स्पर्धेतील त्याचे हे तिसरे अर्धशतक ठरले. यापूर्वी त्याने अफगाणिस्तान आणि भारताविरुद्धही अर्धशतके झळकावली होती.

निम्मा संघ 141 धावा गारद झाल्यानंतर सौद शकील आणि शादाब खान यांनी पाकिस्तानचा डाव पुढे नेला. दोघांनी सावध फलंदाजी केली आणि सेट झाल्यानंतर झटपट धावा केल्या. शादाब 36 चेंडूत 43 धावा करून बाद झाला. दोघांमध्ये 84 धावांची भागीदारी झाली. मात्र, या दोघांनी केलेल्या भागीदारीने पाकिस्तानला 225 धावांच्या पुढे नेले. काही वेळाने सौदही 52 धावा करून बाद झाला.

45 धावा करताना पाकिस्तानच्या 5 विकेट

सौद आणि शादाब बाद झाल्यानंतर पाकिस्तानच्या फलंदाजीची पडझड झाली. शादाब 225 धावांच्या धावसंख्येवर बाद झाला, संघाला येथून केवळ 45 धावा करता आल्या आणि शेवटच्या 4 विकेटही गमावल्या. मोहम्मद नवाज (24 धावा) व्यतिरिक्त इतर फलंदाज विशेष काही करू शकले नाहीत. शाहीन आफ्रिदी केवळ 2, मोहम्मद वसीम ज्युनियर फक्त 7 धावा करू शकले. हारिस रौफ शून्यावर नाबाद राहिला.

पाकिस्तान संघ पुन्हा एकदा पूर्ण 50 षटकेही खेळू शकला नाही. द. आफ्रिकेने त्यांना 46.4 षटकांत 270 धावांत गुंडाळले. पाकिस्तानकडून सौद शकीलने 52 आणि कर्णधार बाबर आझमने 50 धावा केल्या. शादाब खानने 43 आणि मोहम्मद रिझवानने 31 धावांचे योगदान दिले. मोहम्मद नवाजने 24, इफ्तिखार अहमदने 21 आणि इमाम उल हकने 12 धावा केल्या. अब्दुल्ला शफीक नऊ, मोहम्मद वसीम ज्युनियर सात आणि शाहीन आफ्रिदी दोन धावा करून बाद झाले. हरिस रौफ खाते न उघडता नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेकडून तबरेझ शम्सीने चार आणि मार्को जॅनसेनने तीन बळी घेतले. गेराल्ड कोएत्झीने दोन आणि लुंगी एनगिडीला एक विकेट मिळाली.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *