‘खराब अंपायरिंगमुळे पाकिस्तानचा पराभव’; भारताच्या खेळाडूने केली नियम बदलण्याची मागणी

World Cup 2023 : वर्ल्डकप 2023 च्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा (PAK vs SA) एका विकेटने पराभव केला आहे. या विजयासह दक्षिण आफ्रिकेचा संघ 10 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. चांगल्या धावगतीमुळे आफ्रिकन संघ गुणतालिकेत भारतापेक्षा पुढे गेला आहे. चेन्नई येथे खेळवल्या गेलेल्या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 46.4 षटकात सर्व गडी गमावून 270 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करामच्या 91 धावांच्या जोरावर संघाने सामना जिंकला. सामन्याच्या शेवटच्या तीन षटकांमध्ये पाकिस्तानला विजयासाठी फक्त एका विकेटची गरज होती. पण वेगवान गोलंदाजांची षटके संपल्यामुळे बाबर आझमला (Babar azam) चेंडू मोहम्मद नवाजकडे द्यावा लागला. त्यानंतर आफ्रिकेचा फलंदाज केशव महाराजने (keshav maharaj) दुसऱ्या चेंडूवर चौकार मारून संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला.

मात्र वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान समालोचन करणाऱ्या हरभजन सिंगने पाकिस्तान पराभवाचं कारण सांगितलं आहे. खराब अंपायरिंग आणि नियमांमुळे पाकिस्तान संघाला पराभवाला सामोरे जावे लागल्याचे हरभजन सिंगने म्हटले आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू ग्रॅमी स्मिथनेही यावर आपलं मत मांडलं आणि या सामन्याबाबत भाष्य केले.

वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान अंपायरच्या निर्णयांची बरीच चर्चा सुरु आहे. असाच काहीसा प्रकार पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या सामन्यादरम्यान पाहायला मिळाला. पाकिस्तान संघाला विजयासाठी एका विकेटची गरज होती. मात्र जोरदार अपीलनंतरही दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाला एलबीडब्ल्यू आऊट करण्यात आले नाही. मात्र, पाकिस्तानने डीआरएस घेतला असता, चेंडू स्टंपला लागल्याचे दिसून आले.

Related News

त्यानंतर हरिस रौफच्या चेंडूवर हरभजनने प्रश्न उपस्थित केला आहे. या चेंडूवर पाकिस्तानचा विजय निश्चित झाला होता मात्र अंपारयच्या निर्णयाने तसं झालं नाही. दक्षिण आफ्रिकेच्या डावातील 46व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर तबरेझ शम्सीला एलबीडब्ल्यू घोषित करण्याचे अपील केले होते. अंपायरने शम्सीला आऊट न दिल्याने कर्णधार बाबरने रिव्ह्यू घेतला. रिव्ह्यूमध्ये चेंडू लेगस्टंपला थोडासा आदळताना दिसला. इथे अंपायर कॉल दिला होता. त्यानंतर मैदानावरील पंचाचा निर्णय नॉट आउट असल्याने दक्षिण आफ्रिकेला जीवदान मिळाले.

त्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत भाष्य केले. “पाकिस्तान हा सामना चुकीच्या अंपायरिंगमुळे आणि चुकीच्या नियमांमुळे हरला. आयसीसीने हा नियम बदलायला हवा. चेंडू स्टंपला लागला तर तो आऊट, अंपायरने आऊट दिले की नॉट आउट, काही फरक पडत नाही. नाहीतर या तंत्रज्ञानाचा काही वापर आहे का?” अशी पोस्ट हरभजनने केली. 

यावर ग्रॅम स्मिथनेही आपलं मत व्यक्त करत भज्जीला प्रत्युत्तर दिलं. “ठीक आहे, अंपायरच्या कॉलबद्दल मला तुमच्यासारखेच वाटते. पण रॅसी व्हॅन डर ड्युसेन आणि दक्षिण आफ्रिकेलाही असेच वाटते का?” असे ग्रॅमी स्मिथने विचारले.

जर ही विकेट मिळाली असती तर सामना इथेच संपला असता आणि पाकिस्तान संघाने 7 धावांनी सामना जिंकला असता. कारण यावेळी दक्षिण आफ्रिकेने 263 धावांवर 9 विकेट गमावल्या होत्या. या चुकीनंतर दक्षिण आफ्रिकेने पुढच्या 8 चेंडूत विजय मिळवला. यावरच हरभजनने प्रश्न उपस्थित केला आहे.Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *