जिंतूर; महातंत्र वृत्तसेवा : मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या जोर धरत असताना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आता मराठा आरक्षणाला पाठिंबा देत चक्क आरक्षणासाठी सहामाही व वार्षिक परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत जिंतूर तालुक्यातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आज (दि.२) जिंतूर तहसीलदार यांना निवेदन दिले.
जिंतूर शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकत जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत सहामाही वार्षिक परीक्षा न देण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी सकाळी सर्व मुले शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ जमली. आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, जय शिवाजी जय भवानी, आरक्षण नाही तोपर्यंत परीक्षा नाही, असा पवित्रा घेत घोषणाबाजी केली.
आरक्षण नसेल तर शिकून तरी काय करायचे, आम्हाला सवलत नसल्याने उच्च शिक्षण घेता येणार नाही. त्यापेक्षा सरकारने आरक्षण द्यावे. आरक्षण दिले नाही तर परीक्षा देणार नाहीक, शाळा पण नको, या भूमिकेशी आम्ही ठाम राहणार असल्याचे सांगत शहरातून घोषणा देत तहसील कार्यालय गाठले. या ठिकाणी उपोषण स्थळी बसलेल्या मराठा बांधवांना पाठिंबा देत आरक्षण नाही तर परीक्षा नाही याबाबतचे निवेदन तहसीलदारांना दिले. तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनावर आदित्य गायकवाड, नरेश बिराजदार, शुभम शिंदे, अंकुश नेवरे, अजिंक्य देवकर, योगेश सोळंके, गणेश जाधव यांच्यासह शेकडे विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरी आहेत.
उपोषणार्थीची प्रकृती खालावली
तहसील कार्यालयात सकल मराठा समाजाच्या वतीने २९ ऑक्टोबर पासून तीन उपोषणार्थींनी उपोषण सुरू केले आहे. यामध्ये विलास रोकडे यांची उपोषणाच्या चौथ्या दिवशी प्रकृती खालावल्याने त्यांना रात्री ८ वा. जिंतूर ट्रामा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले.