‘पवार साहेबांनी 3 वेळा कर्करोगाशी झुंज दिली अन्…’, शिवसेनेचा उल्लेख करत सुप्रिया सुळेंचा भाजपला टोला!

Supriya Sule On BJP : अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडली अन् महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळाली. लोकसभेत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजपवर निशाणा लगावण्याची संधी सोडली नाही. त्यावेळी त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना देखील टोला लगावला होता. अशातच आता सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीका करत भाजपला खडेबोल सुनावले आहेत. विरोधी पक्षांची आणि विचारांची ‘स्पेस’ भाजपाला मान्य नाही, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. सुप्रिया सुळे यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करत भाजपवर सडकून टीका केलीये.

पोस्टमध्ये काय लिहिलंय?

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रात राहणारा प्रत्येकजण ‘मराठी माणूस’ अशी मराठी माणसाची व्याख्या केली होती. महाराष्ट्रीय माणसांनी प्रचंड मेहनत करुन, प्रागतिक विचार जोपासत विकसित महाराष्ट्राची उभारणी केली. अनेक क्षेत्रांत देशाला दिशा दाखविण्याचं काम केलं. पण केंद्र आणि राज्यात सत्तेवर असणाऱ्या भाजपाने येनकेनप्रकारे मराठी माणसांनी मोठ्या कष्टाने उभारलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष विधिनिषेध शून्य मार्गांनी फोडलं. 

शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचविली. त्याचप्रमाणे आदरणीय पवार साहेबांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करुन ती देशभरात पोहोचविण्याचे काम केले. या दोन्ही नेत्यांनी आपल्या कुटुंबाचा समाजकार्याचा वारसा घेऊन प्रचंड मेहनतीने डोंगराएवढे कार्य उभे  केले व देशभरात दबदबा निर्माण केला.

Related News

गेली साठ वर्षे या दोन्ही नेत्यांचे विचार आणि नेतृत्व मान्य करुन  लाखो  कार्यकर्त्यांनी हे पक्ष उभे केले. याबद्दल आम्ही सदैव त्यांच्या ॠणात आहोत. देशातील व महाराष्ट्रातील मायबाप जनतेने स्व.बाळासाहेब ठाकरे व आदरणीय पवार साहेबांना भरभरून प्रेम दिले. पण त्यांची ही ताकद व  हे प्रेम भाजपला बघवत नाही. 

आदरणीय पवार साहेबांनी तीन वेळा कर्करोगाशी झुंज दिली. प्रत्येक वेळी ते जनतेचे प्रेम आणि आशिर्वाद यांच्या बळावर जनसेवेसाठी बरे होऊन पुन्हा कामाला लागले. यासाठी माय-बाप जनतेचे आम्ही कायम ऋणी आहोत. महाराष्ट्रातील जनतेला भावणारे आणि त्यांच्या हितासाठी सदैव काम करणारे पक्ष आणि माणसे कटकारस्थाने करून संपवण्याचा घाट भाजपाने घातला आहे. त्यासाठी केंद्रातील एजन्सीजचा बेसुमार गैरवापर केला जातोय, पाण्यासारखा पैसा ओतला जातोय. 

महाराष्ट्रातील जनतेमध्ये आपापसात भांडणे लावून, त्यांची ताकद खच्ची करून भाजपला आनंद मिळतो, परंतू या तत्वशून्य फोडाफोडीतून राज्याची प्रतिमा मालिन करण्याचे पाप भाजपला करत आहे. लोकशाही व्यवस्थेत अत्यावश्यक असणारी विरोधी पक्षांची आणि विचारांची ‘स्पेस’ भाजपाला मान्य नाही, हेच सातत्याने अधोरेखित होते आहे, असं सुप्रिया सुळे म्हणतात.

Supriya Sule On Ajit Pawar: ‘प्रेम कमी होणार नाही, माझ्या मनात…’; अजितदादांच्या बंडावर सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या

पाहा पोस्ट

दरम्यान, आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी महाराष्ट्र पिंजून काढण्यास सुरूवात केली आहे. तर दुसरीकडे अजित पवार देखील जोर लावताना दिसत आहेत. अशातच आता उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार आगामी निवडणुकीत समीकरण कसं जुळणार? त्याचबरोबर काँग्रेसची भूमिका नेमकी काय असणार? असा सवाल विचारला जातोय.



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *