1200 भरा, महिन्याला 10,000 घ्या; महाराष्ट्रातील आजपर्यंतचा सर्वात मोठा स्कॅम; तब्बल 100 कोटींची लूट

Nanded Crime News :  आतापर्यंत तुम्ही फसवणुकीचे अनेक प्रकार पाहिले असतील मात्र मराठवाड्यात एका टोळीनं दामदुप्पटीचा स्कॅम करत लोकांना कोट्यवधींचा गंडा घातलाय. या टोळीनं गावोगावी एजंट नेमले. स्वस्तात अन्नधान्य, अत्यंत कमी दरात इलेक्ट्रिक दुचाकी, शिलाई मशीन, लॅपटॉप देण्याचं आमिष दाखवलं, इतकच नाही तर विधवा महिलांना पेन्शन देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडूनही पैसे उकळले. प्रत्यक्ष परतावा देण्याची वेळ आली तेव्हा या भामट्यांनी हात वर केले. लुटीच्या या गोरखधंद्यानं मराठवाड्यात खळबळ उडालीय. ही लूट एक दोन कोटींची नाही तर तब्बल 100 कोटींची लूट आहे. 

झटपट श्रीमंत होण्याची स्कीम दाखवून फसवणुक

1100 रूपयांत 6 महिन्यांचं किराणा सामान, 3 हजारांत इलेक्ट्रिक दुचाकी, 1200 रूपये भरा, दरमहा 10 हजार घ्या… ही कोणती शासकीय योजना नाही तर मराठवाड्यातली मालामाल होण्याची स्कीम. बसला ना धक्का तुम्हाला…असाच धक्का अनेकांना बसला आणि झटपट श्रीमंत होण्यासाठी अनेकांनी या स्कीममध्ये पैसे गुंतवले.

मराठवाड्यात 700 एजंट नेमले

नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर आणि जालन्यात यासाठी जवळपास 700 एजंट नेमण्यात आले. महाराष्ट्र राज्य अन्नदाता सेवा केंद्र, जनकल्याण कामगार संघटना महाराष्ट्र राज्य अश्या नावांचा वापर करून लोकांना स्वस्तात धान्य, स्वस्तात शिलाई मशीन, अत्यंत माफक दरात इलेक्ट्रीक बाईक देण्याचं आमिष दाखवण्यात आलं.  लोकांचा विश्वास संपादित करण्यासाठी सुरूवातीला थोड्याफार प्रमाणात अन्नधान्यही देण्यात आलं. नंतर मात्र या स्वप्न दाखवणा-या या टोळीनं शेकडो लोकांना हातोहात गंडवल्याचं उघड होताच अनेकांची पाचावर धारण बसली.  या टोळीनं 100 कोटींपेक्षा जास्त लूट केल्याचा संशय आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून 13 आरोपींपैकी तीन जणांना अटक केलीय. राजकुमार सुतारे, भीमराव वाघमारे, नरेश इंगोले, संतोष गच्चे अशी मुख्य आरोपींची नावं आहेत.

Related News

काय होती मोडस ऑपरेंडी?

हे लुटारू छ्त्रपती शिवाजी महाराज सेवाभावी संस्था संचलित महाराष्ट्र राज्य अन्नदाता सेवा केंद्र नावानं योजना चालवायचे. त्याअंतर्गत त्यांनी 1100 रूपयांत गहू, तांदूळ, साखर, शेंगदाणा, पोहा असा 85 किलोंचा शिधा देण्याचं आमिष दाखवलं. अवघ्या 3 हजारात इलेक्ट्रिक बाईक मिळेल असंही सांगण्यात आलं. 2200 रूपयांत शिलाई मशीन, विधवा महिलांनी महिन्याकाठी 1200 रूपये भरल्यास वर्षभर 10 हजार रूपये आणि नंतर पेन्शन देण्याचं आमिष दाखवण्यात आलं. 

 



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *