नवी सांगवी : महातंत्र वृत्तसेवा : पिंपळे गुरव येथील रामकृष्ण चौकातील पेरूच्या बागेच्या रोडवर रविकिरण हाईट्ससमोरील रस्त्याच्या कडेला दुतर्फा बाजूस मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन येथील परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे महापालिकेचे आरोग्य विभाग डोळे झाक करीत आहे. येथील पेरूच्या बागेच्या रोडवर नर्मदा गार्डनकडे जात असताना डाव्या बाजूला अंतर्गत रस्त्यावर रविकिरण हाईट्स इमारत आहे. या इमारतीच्या समोरील रस्त्याच्या कडेला सुरक्षा भिंतींना लागून मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे.
यातच रस्त्यावरील कचरादेखील त्यात साचत आहे. नुकताच पावसाळा संपला आहे. थंडीचे दिवसही सुरू झाले आहेत. त्यामुळे दवबिंदू साचून याठिकाणी ओलावा निर्माण होत आहे. यामुळे येथील परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात झाली असून, दिवसेंदिवस येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे.
डेंग्यू, मलेरिया, हिवताप यासारखे आजार फैलावत असताना शासनाकडून, प्रशासनाकडून जनजागृती करीत नागरिकांना स्वच्छतेबाबत आवाहन करीत असतात. मात्र संबंधित प्रशासनच याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे नागरिक डासांच्या उत्पत्तीमुळे भयभीत झाले आहेत. संबंधित आरोग्य विभागाच्या अधिकार्यांनी याकडे दुर्लक्ष न करता त्वरित येथील वाढलेले गवत काढून टाकण्यात यावे, अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.
याबाबत नुकतीच माहिती मिळाली. या ठिकाणी पाहणी करून घेते. वाढलेले गवत असल्यास त्वरित कर्मचारी लावून त्या परिसरातील गवत काढण्यात येईल. तसेच डासांची उत्पत्ती होत असल्यास या परिसरात औषध फवारणीदेखील करून देण्यात येईल.
धनश्री जगदाळे,आरोग्य निरिक्षक
हेही वाचा
संगोपन : पालक मीटिंगचे महत्त्व ओळखा
Pimpri News : आंदोलन स्थगित केल्याने लालपरी पुन्हा सज्ज
Pune news : अविनाश भिडे खून प्रकरण : दयानंद इरकलसह तेरा जणांवर गुन्हा